Hardik Pandya Krunal Pandya IPL 2023 Photo: इंडियन प्रिमिअर लिगमध्ये (IPL 2023) रविवारी म्हणजेच 7 मे रोजी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्याने (Krunal Pandya) एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. रविवारी पार पडलेल्या आयपीएलच्या 2 सामन्यांपैकी पहिला सामना हा गुजरात आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या संघांदरम्यान खेळवण्यात आला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यामध्ये पंड्या बंधूंनी आपआपल्या संघाचं नेतृत्व केलं. अशाप्रकारे आयपीएलमध्ये परस्पर विरोधी संघांचं नेतृत्व करणारी पंड्या बंधूंची पहिलीच जोडी ठरली आहे.
नाणेफेकीसाठी मैदानात आलेल्या हार्दिक आणि कृणालचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. दोन सख्ख्या भावांनी वेगवेगळ्या संघांमधून खेळणं ही आता सामान्य बाब असली तर परस्परविरोधात खेळणाऱ्या संघांचं नेतृत्व एकाच सामन्यात सख्ख्या भावांनी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यामुळेच या दोघांवर सोशल मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव झाला. सोशल मीडियावर या सामन्यासंदर्भातील अनेक हॅशटॅग चर्चेत असतानाच हार्दिक आणि कृणालचं नावही ट्रेण्डमध्ये असल्याचं दिसलं. हा सामना गुजरातने जिंकला असला तरी या दोन्ही भावांनी एकाच सामन्यात वेगवेगळ्या संघांचं नेतृत्व केल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली.
The two Pandya brothers are up against one another here in Ahmedabad.
Who do you reckon will come on Top after Match 51 of the #GTvLSG pic.twitter.com/Zvh2kRRjwN
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2023
या सामन्यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने सोशल मीडियावरुन आपल्या थोरल्या भावाबरोबरचा म्हणजेच कृणालबरोबरचा एक खास फोटो शेअर केला. या फोटोला हार्दिकने अगदी भावनिक कॅप्शन दिली. या फोटोमधील डावीकडचा फोटो हा हार्दिक आणि कृणालच्या लहानपणीचा फोटो आहे. तर उजवीकडील फोटो हा रविवारी झालेल्या सामन्यामध्ये दोघेही नाणेफेक करण्यासाठी मैदानात एकत्र आले तेव्हाचा आहे. हा फोटो शेअर करताना हार्दिकने, "बडोद्यामधील दोन तरुण मुलं ज्यांनी कधीच त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग सोडला नाही," अशी कॅप्शन दिली आहे.
Just two young boys from Baroda who never gave up on their dreams @krunalpandya24 pic.twitter.com/VkescaxBcn
— hardik pandya (@hardikpandya7) May 7, 2023
लखनऊचा कर्णधार के. एल. राहुल दुखापतीमुळे स्पर्धेमधून बाहेर पडल्याने संघाचं नेतृत्व कृणालकडे सोपवण्यात आलं आहे. हार्दिक आणि कृणाल हे दोघेही मुंबई इंडियन्सच्या संघातून अनेक वर्ष एकत्रच खेळले. मात्र 2021 च्या पर्वामध्ये पहिल्यांदाच हे दोघे वेगवेगळ्या संघांकडून खेळले. हार्दिकला गुजरात टायटन्सने लिलावामध्ये आपल्या संघात समावून घेत संघाचं नेतृत्व त्याच्याकडे सोपवलं. हार्दिकनेही गुजरातच्या संघाचं नेतृत्व करताना पहिल्याच पर्वात थेट जेतेपदापर्यंत मजल मारत मालकांचा विश्वास सार्थ ठरवला. तर दुसरीकडे कृणाल पंड्यानेही लखनऊच्या पहिल्या पर्वामध्ये त्यांना बाद फेरीपर्यत नेण्यात मोलाचं योगदान दिलं.