IPL 2024: कोलकाताने 24.75 कोटीत खरेदी केल्यानंतर मिचेल स्टार्कला धक्का, म्हणाला 'पत्नी भारतात...'

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) नवा इतिहास रचला असून, सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला 24 कोटी 75 लाखांत विकत घेतलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 20, 2023, 01:18 PM IST
IPL 2024: कोलकाताने 24.75 कोटीत खरेदी केल्यानंतर मिचेल स्टार्कला धक्का, म्हणाला 'पत्नी भारतात...' title=

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आयपीएलच्या इतिहासात आपल्या नावाची नोंद केली आहे. मिचेल स्टार्क आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला तब्बल 24 कोटी 75 लाखांत विकत घेतलं आहे. मिचेल स्टार्कला विकत घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चांगलीच जुंपली होती. पण केकेआरचा मेन्टॉर गौतम गंभीरने अखेर ही लढत जिंकली. मिचेल स्टार्क संघात आल्यानंतर केकेआरने एक्सवर त्याच्या प्रतिक्रियेचा पहिला व्हिडीओ शेअर केला आहे. 

"केकेआरच्या चाहत्यांनो, यावर्षी आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी मी प्रचंड उत्साही आहेत. ईडन गार्डन्समध्ये आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी, ते वातावरण आणि आनंद अनुभवण्यासाठी मी आता जास्त प्रतिक्षा करु शकत नाही. चला तर मग आता आपली लवकरच भेट होईल," अशी प्रतिक्रिया मिचेल स्टार्कने दिली आहे. 

"मला यामध्ये सहभागी होऊन आता थोडा वेळ झाला आहे. या लिलावात माझं नाव आल्याबद्दल तसंच केकेआरमध्ये सहभागी होण्याबद्दल मी प्रचंड उत्साही आहे. मला प्रचंड आनंद आहे," असं स्टार्कने जिओ सिनेमावर नाईट रायडर्सशी संवाद साधताना सांगितलं. 

"हो मला प्रचंड धक्का बसला. खरं तर माझी पत्नी अॅलिसा सध्या भारतात आहे," असंही मिचेल स्टार्कने म्हटलं. "मला वाटतं भारतात ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत लवकर कव्हरेज होत होतं. त्यामुळे मला टीव्हीच्या तुलनेत लवकर अपडेट्स मिळत होते. त्यामुळे मी म्हटलं त्याप्रमाणे फार आश्चर्यचकित होतो. आयपीएलच्या नव्या हंगामात येत असल्याचा मला प्रचंड आनंद आहे. केकेआरकडून खेळण्यासाठी खूप उत्साही आहे," असं स्टार्कने सांगितलं आहे.

केकेआर आणि गुजरात टायटन्स यांच्यात मिचेल स्टार्कला खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस रंगली होती. मिचेल स्टार्कने नेहमीच आयपीएच्या तुलनेच राष्ट्रीय संघाला महत्त्व दिलं आहे. पण आयपीएलनंतर लगेच टी-20 वर्ल्डकप होणार असल्याने मिचेल स्टार्क या आयपीएलमध्ये खेळत आहे. आतापर्यंत त्याने आयपीएलचे फक्त दोन हंगाम खेळले असून 27 सामन्यांमध्ये 20.38 च्या सरासरीने 34 विकेट्स घेतले आहेत. 

मिचेल स्टार्क नियमितपणे आयपीएल खेळत होता. पण 2023 मध्ये अॅशेस आणि वर्ल्डकपवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी त्याने न खेळण्याचा निर्णय घेतला होता. 

दरम्यान पॅट कमिन्ससाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातही लढत झाली. अखेर हैदराबादने 18.5 कोटीत त्याला खरेदी केलं.