IPL 2024: आयपीएलमध्ये आता प्लेऑफला पात्र होण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. दरम्यान बुधवारी झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) लखनऊ सुपरजायंट्सचा (Lucknow Super Giants) दारुण पराभव केला आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर के एल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 2022 मध्ये 17 कोटीत खरेदी करण्यात आलेल्या के एल राहुलला लखनऊ संघ 2025 च्या लिलावात पुन्हा रिटेन न करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे के एल राहुल स्वत:च पुढील दोन सामन्यात फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत करण्याच्या हेतूने कर्णधारपद सोडू शकतो असं बोललं जात आहे.
आयपीएलमधील सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, "दिल्ली कॅपिटल्सविरोधातील सामन्याआधी 5 दिवसांचा वेळ आहे. सध्या तरी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण जर के एल राहुलला उर्वरित दोन सामन्यांमध्ये फक्त फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत करायचं असेल तर व्यवस्थापनाचा त्यावर काही आक्षेप असण्याचं कारण नाही".
सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासात प्रथमच लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला. हैदराबादने 10 गडी राखून हा ऐतिहासिक विजय नोंदवला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 20 ओव्हरमध्ये चार विकेट्स गमावून 165 धावा केल्या होत्या. हैदराबादने फक्त 9.4 ओव्हरमध्ये 166 रन्सचं लक्ष्य गाठलं. हैदराबादने 62 चेंडू राखत आयपीएलमध्ये एका मोठ्या विजयाची नोंद केली. ट्रेविस हेडने 30 चेंडूत 89 आणि अभिषेक शर्माने 28 चेंडूत 5 धावा ठोकल्या.
KL Rahul appears to be a corporate majdoor meeting with his Boss Goenka for an appraisal.
This is unacceptable behaviour #KLRahul #SRHvLSG #SRHvsLSG pic.twitter.com/twyNVnTOGn
— Ex Bhakt (@exbhakt_) May 9, 2024
हा पराभव लखनऊ संघाचे माल्क संजीव गोयंका यांच्याही जिव्हारी लागला. दरम्यान सामन्यानंतर ते के एल राहुलशी संवाद साधतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते के एल राहुलशी फार संतापून बोलताना दिसत आहे. आता त्यांचा संताप पराभवामुळेच झाला की इतर काही कारण होतं हे स्पष्ट झालं नाही.
या सामन्यात के एल राहुलच्या फलंदाजीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. त्याने 33 चेंडूत 29 धावा केल्या. पॉवरप्लेमधील त्याची ही कासवखेळी लखनऊच्या वाईट कामगिरीसाठी जबाबदार धरली. या सर्व कारणांमुळे संजीव गोयंका यांचा पारा चढला असावा आणि ते संतापले असावेत.
के एल राहुलने 12 सामन्यांत 460 धावा केल्या आहेत. या हंगामातही तो 500 धावांचा टप्पा ओलांडू शकतो. परंतु त्याचा 136.09 हा स्ट्राइक रेट हा चिंतेचा विषय आहे. दरम्यान लखनऊ संघ अद्यापही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. उर्वरित दोन सामने जिंकून ते 16 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. 14 मे रोजी नवी दिल्ली येथे दिल्ली कॅपिटल्स आणि 17 मे रोजी वानखेडे येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध त्यांचा सामना होणार आहे. पण संघाचा नेट रन-रेट (-0.760) चिंतेचा विषय आहे. त्याच्यात सुधारणा होणं शक्य दिसत नाही आहे.
राहुलने पायउतार होण्याचा निर्णय घेतला तर उपकर्णधार निकोलस पूरन उर्वरित दोन सामन्यांसाठी नेतृत्व स्विकारु शकतो. निकोलस पूरन या मोसमातील संघाचा सर्वात प्रभावी फलंदाज आहे.