मुंबई : Legends League Cricket: क्रिकेट रसिकांसाठी चांगली बातमी. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांचे क्रिकेटमध्ये पुनरागमन होणार आहे. पुन्हा एकदा मैदानावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करताना ते दिसणार आहेत. लेजेंड्स लीग क्रिकेटने ( Legends League Cricket- LLC) गुरुवारी जाहीर केले की भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग अदानी समूहाच्या मालकीच्या गुजरात जायंट्सचे नेतृत्व करेल तर त्याचा सलामीचा जोडीदार गौतम गंभीर जीएमआर समूहाच्या मालकीच्या इंडिया कॅपिटल्सचे नेतृत्व करेल.
सेहवाग म्हणाला, 'पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर येण्यासाठी मी उत्साहित आहे. अदानी ग्रुप आणि गुजरात जायंट्स सारख्या व्यावसायिक संस्था संघ फ्रँचायझींच्या रूपात पुन्हा एकदा क्रिकेटची ही इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज आहे. माझा वैयक्तिकरित्या नेहमीच निर्भय क्रिकेट खेळण्यावर विश्वास आहे आणि आम्ही येथेही याच प्रकारचे क्रिकेट खेळत राहू. आम्ही खूप उत्सुक आहोत आणि आमची टीम निवडण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत.
सेहवाग आणि गंभीर यांच्या नेतृत्वाखालील लेजेंड्स लीग क्रिकेटच्या दोन सीझनमध्ये चाहत्यांसाठी त्यांच्या आवडत्या स्टार्सना त्यांचा खेळ पाहण्याची उत्तम संधी असेल. गंभीर म्हणाला, 'माझा नेहमीच विश्वास आहे की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि कर्णधार हा त्याच्या संघाइतकाच चांगला असतो. मी इंडिया कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करत असताना, जिंकण्यासाठी उत्सुक असलेल्या उत्साही संघासाठी मी प्रयत्न करेन. मी लेजेंड्स लीग क्रिकेटला शुभेच्छा देतो.
लीजेंड्स क्रिकेट लीगचा आगामी हंगाम चार संघांच्या फ्रँचायझीसह खेळला जाईल, जो मागील हंगामातील तीन संघांच्या स्वरुपातील बदल आहे आणि त्यात 16 सामने असतील. आगामी हंगाम भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या उत्सवासाठी समर्पित असल्याचेही लीगने जाहीर केले.
आगामी एलएलसी सीझन 16 सप्टेंबरपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्स येथे भारत महाराजा विरुद्ध विश्व जायंट्स यांच्यातील विशेष सामन्याने सुरु होईल. यानंतर लखनऊ, नवी दिल्ली, कटक आणि जोधपूर येथे सामने होतील. प्ले-ऑफ आणि फायनलचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.