Mohammad Shami's wife : भारतीय क्रिकेट संघाचा धुवांदार स्टार खेळाडू मोहम्मद शमी (Mohammad Shami) गेल्या काही दिवसात वैवहिक जीवन देखील खूप चर्चेत राहिलाय. पत्नी हसीन जहाँने (Hasin Jahan) दाखल केलेल्या घरगुती हिंसाचारप्रकरणी कोलकात्याच्या अलीपूर न्यायालयाने शमीचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे शमी सध्या वर्ल्ड कप खेळताना दिसत आहे. वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) संधी मिळताच शमीने संधीचं सोनं केलं. मोहम्मद शमीने गेल्या 3 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. शमीच्या या कामगिरीवर सर्व क्रिकेट प्रेक्षक खूश असल्याचं पहायला मिळतंय. अशातच शमीची पत्नी हसीन जहाँ हिला जेव्हा शमीच्या कामगिरीवर विचारण्यात आलं, तेव्हा तिने काय उत्तर दिलंय पाहा...
मी कधी क्रिकेट बघत नाही. त्यामुळे मी कोणत्याही क्रिकेटर्सची फॅन नाही, तसेच मी क्रिकेटची देखील फॅन नाही. त्याने किती विकेट घेतल्या त्यातलं मला काही कळत नाही. तो चांगलं खेळतोय, त्यामुळे तो संघात टिकून राहिल. त्यामुळे त्याची कमाई देखील चांगली राहिल, त्यामुळे आमचं भविष्य सुरक्षित असेल. मी टीम इंडियाला शुभेच्छा देईल, पण मी त्याला शुभेच्छा देणार नाही, असं हसीन जहाँ म्हणाली आहे. शमी कसा खेळतो, तो फायनलमध्ये कसा खेळतो? मला त्याने फरक पडत नाही. लोक त्याला कसा समजतात, याने देखील मला फरक पडत नाही. मला ऐवढंच माहितीये की, तो माझा पती आहे आणि त्याने आम्हाला सांभाळायचं आहे, असं हसीन जहाँ म्हणाली आहे.
मोहम्मद शमी मला कधी कोणत्याही टूरला घेऊन जात नव्हता. मला नेहमी दबावात ठेवायचं काम तो करायचा. मी त्याच्याशी भांडून 3 किंवा 4 टूरला त्याच्यासोबत गेले. मात्र, तिथंही त्याने मला नीट वागवलं नाही. माझ्यासोबत भांडणं केली, मला खोलीत बांधून ठेवलं होतं. बीसीसीआयने प्लेयर्सच्या पत्नींना सांगितलं होतं की, हसीनसोबत कोणी बोलू नका. त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे मी देखील कोणत्याही खेळाडूंच्या पत्नीला कॉन्टँक्ट केला नाही, असं उत्तर देखील हसीन जहाँने दिलं आहे.
दरम्यान, मोहम्मद शमीच्या पत्नीने मार्च 2018 मध्ये घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. हसीन जहाँने आपल्या तक्रारीत शमीवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तसेच मानसिक त्रास देत असल्याची तक्रार देखील करण्यात आली होती. दोघांविरुद्ध अटक वॉरंटही जारी केलं होतं. मात्र, कोलकाता न्यायालयाने या वॉरंटला स्थगिती दिली होती. त्याआधी, मोहम्मद शमीने हसीन जहाँला मासिक देखभाल भत्ता 1.30 लाख देण्याचे आदेश दिले होते. मोहम्मद शमी सध्या चांगली गोलंदाजी करतोय, शमीला स्टंपमध्ये देखील तिच्या पत्नीचा चेहरा दिसतो, असे मिम्स देखील व्हायरल होत आहेत. त्यामुळे हसीन जहाँ चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.