आयपीएल २०१९ : 'मोहम्मद शमीला पुरेसा आराम दिला जाणार'

क्रिकेट वर्ल्ड कप लक्षात घेता आयपीएलदरम्यान खेळाडूंना काही मॅचमध्ये आराम देण्यात यावा

Updated: Mar 20, 2019, 08:24 PM IST
आयपीएल २०१९ : 'मोहम्मद शमीला पुरेसा आराम दिला जाणार'

मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कप लक्षात घेता आयपीएलदरम्यान खेळाडूंना काही मॅचमध्ये आराम देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. या मागणीवर आयपीएलमधल्या पंजाब टीमचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलदरम्यान मोहम्मद शमीला पुरेसा आराम दिला जाईल, असं हेसन म्हणाले. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आयपीएल दरम्यान खेळाडूंवर येणाऱ्या 'वर्कलोड' बद्दल चर्चा सुरु आहे. खेळाडूंनी आरामाबद्दल स्वत: निर्णय घ्यावा, असं कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा याने आधीच सांगितलं आहे.

मोहम्मद शमीने मागच्या वर्षभरात जसप्रीत बुमराहबरोबर शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे वर्ल्ड कप टीममध्ये त्याची निवड निश्चित मानली जात आहे.

पंजाबचे प्रशिक्षक माईक हेसन म्हणाले, 'मी केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांच्याशी बोललो आहे. त्या दोघांना आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करायची आहे. पण आम्ही त्यांना मॅचदरम्यान योग्य आराम देऊ. जर आयपीएलमध्ये खेळाडूंना थकल्यासारखं वाटत असेल तर त्यांना विश्रांती मिळेल. त्यांना अतिरिक्त सरावाची गरज असेल, तर ती सुविधाही देण्यात येईल. आम्हाला टीमची कामगिरीही बघावी लागेल, पण सगळे चांगली कामगिरी करण्यासाठी उत्साही आहेत.'

पंजाबच्या टीमपुढे परदेशी खेळाडूंची उपलब्धता हीदेखील मोठी समस्या असणार आहे. कारण वेस्ट इंडिजचा क्रिस गेल, दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर आणि अफगाणिस्तानचा मुजीब जदरान यांची त्यांच्या देशाच्या टीममध्ये निवड निश्चित आहे. खेळाडूंची उपलब्धता एक समस्या आहे, पण त्याचा फारसा फरक पडणार नाही, असं हेसन यांना वाटतं.

आयपीएलला सुरु होण्याआधीच धक्का, या देशांचे खेळाडू अर्धावेळच उपलब्ध