मुंबई : टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार असलेल्या एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आपण निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. ७ वाजून २९ मिनिटांपासून आपण निवृत्त झालं असल्याचं समजावं, असं धोनीने त्याच्या इन्स्टाग्रामवर टाकलं आहे. इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनीने मै पल दो पल का शायर हूं, हे गाणंही वापरलं आहे.
निवृत्त होतानाच धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम केले आहेत. टी-२० वर्ल्ड कप, ५० ओव्हरचा वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा आयसीसीच्या तिन्ही स्पर्धा जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप, २०११ सालचा ५० ओव्हरचा वर्ल्ड कप आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीच्याच नेतृत्वात भारत पहिल्यांदा टेस्ट क्रिकेट क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १९५ स्टम्पिंग करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक १५० टी-२० मॅच जिंकण्याचा विक्रम, विकेट कीपर म्हणून वनडेमध्ये सर्वाधिक स्कोअर (श्रीलंकेविरुद्ध २००५ साली १८३ नाबाद), कर्णधार म्हणून सर्वाधिक ३३२ आंतरराष्ट्रीय मॅच, सर्वाधिक म्हणजेच ६ टी-२० वर्ल्ड कपमध्ये देशाचं नेतृत्व करणं (२००७, २००९, २०१०, २०१२, २०१४, २०१६) हे विश्वविक्रम धोनीच्या नावावर आहेत.
२००७ साली धोनीला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, २००९ साली पद्मश्री आणि २०१८ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. २००८ आणि २०१९ साली धोनीला आयसीसी वनडे प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला. दोन वेळा आयसीसीचा हा पुरस्कार पटकवणारा धोनी हा पहिलाच खेळाडू होता.
एमएस धोनीने ५३८ मॅचमध्ये १७,२६६ रन केले, यामध्ये १६ शतकं आणि १०८ अर्धशतकांचा समावेश आहे. स्टम्पमागे धोनीने ८२९ विकेट घेतल्या.
धोनीने ३५० वनडेमध्ये ५०.५८ च्या सरासरीने १०,७७३ रन केले, यामध्ये १० शतकं आणि ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ९८ टी-२० मॅचमध्ये धोनीने ३७.६ च्या सरासरीने १,६१७ रन केले. टी-२० क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर २ अर्धशतकं आहेत. २०१४ सालीच धोनीने टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतली होती. ९० टेस्ट मॅचमध्ये धोनीने ३८.०९ च्या सरासरीने ४,८७६ रन केले. यामध्ये ६ शतकं आणि ३३ अर्धशतकं होती.