मुंबईतल्या दोन्ही करोना संशयित रुग्णांची सॅम्पल निगेटिव्ह

मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या दोन्ही रुग्णांची कोरोना व्हायरस टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

Updated: Jan 24, 2020, 10:42 PM IST
मुंबईतल्या दोन्ही करोना संशयित रुग्णांची सॅम्पल निगेटिव्ह

मुंबई : मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या दोन्ही रुग्णांची कोरोना व्हायरस टेस्ट निगेटिव्ह आली आहे. दोन संशयित रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते. भारतातून एकूण ४ संशयित रुग्णांची सॅम्पल तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आली होती. यातले दोन संशयित मुंबईचे तर एक बंगळुरुचा आणि एक हैदराबादचा आहे. यातल्या मुंबईच्या दोन्ही रुग्णांचं करोना सॅम्पल निगेटिव्ह आली आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईतल्या एका रुग्णाला रायनोव्हायरस म्हणजेच नेहमीचा ताप आला आहे. 

इतरांना कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून कस्तुरबा रुग्णालयात वेगळा वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचे दोन संशयित रुग्ण चीनहून परतले होते.

चीनमध्ये पसरलेल्या कोरोना (corona virus)  व्हायरसचं सावट सध्या संपूर्ण जगावर आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता या राज्यांच्या विमानतळांवर देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी देखील विमानतळांवर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जगभरात खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

चीनच्या वूआंग शहरात लागण झालेल्या नोवेल कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू तर ३०० जणांना या विषाणूचा संसर्ग आला आहे. परदेशातून आलेला हा व्हायरस रूग्णांमार्फत भारतात पसरण्याची भिती वर्तवली जात आहे.

चीनसोबतच आता थायलँड, सिंगापूर, मलेशिया या देशांमध्ये देखील या विषाणूचा धोका पसरत आहे. या पार्श्वभूमीवर परदेशी प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय एसओएस’ या कंपनीने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

- चीनमधून ये-जा करणाऱ्या प्रवासांसाठी विमानतळावर आऱोग्य तपासणीची व्यवस्था केली आहे. प्रवासांनी याला प्रतिसाद द्यावा.

- आजारी असल्याने प्रवास करणे शक्यतो टाळा.

जागतिक आरोग्य संस्थने (WHO) भारत देशासोबतच अन्य देशांना देखील सतर्कतेचा इशारा देत हा वायरस अत्यंत धोकादायक असल्याचं सांगितले आहे. या वायरसमुळे सामान्य लोकांचा बळी जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 

चीन सरकारने या बातमीला दुजोरा दिल्यानंतर जागतिक आरोग्य संस्थेने संपूर्ण जगाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशात या विषाणूच्या लागणीचे नमुने तपासण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद समन्वयाने काम करणार आहेत. सध्या जगातील विविध प्रयोगशाळांमध्ये कोरोना वायरसवर अधिक अभ्यास सुरू आहे.