मुंबई: मास्टरब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची एक झलक पाहण्यासाठी किंवा त्याला भेटण्यासाठी त्याचे चाहते किती आतुर असतात, हे आपण आतापर्यंत अनेकदा पाहिले आहे. यापैकी काहींची सचिनला भेटण्याची किंवा बघण्याची इच्छा पूर्ण होते, तर काहींची इच्छा अपूर्णच राहते. अशीच काहीशी वेळ मुंबई महानगरपालिकेवर आली आहे.
क्रिकेटच्या मैदानात असामन्य कामगिरी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या सचिन तेंडुलकरचा नागरी सत्कार करण्याची इच्छा महापालिकेला होती. मात्र, आता तब्बल नऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महापालिकेला आपली ही इच्छा कधीची प्रत्यक्षात येऊ शकणार नाही, याची जाणीव झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सत्काराचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून मुंबई महानगरपालिका नागरी सत्कारासाठी सचिन तेंडुलकरकडे वेळ मागत होती. सर्वप्रथम सन २०१० मध्ये पालिका सभागृहाने सचिनच्या सत्काराचा प्रस्वात मांडला होता. मात्र, प्रत्येकवेळी सचिन कामात व्यस्त असल्याने हा सत्कार सोहळा वारंवार पुढे ढकलावा लागत होता. सत्काराची तारीख निश्चित करण्यासाठी सचिनला वेळोवेळी पत्र पाठवून आठवण करून देण्यात आली होती. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद पालिकेला मिळाला नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने सत्कार करण्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे.
या निर्णयासाठी गटनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकारने सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविल्यानंतर पालिकेतर्फे सचिनचा नागरी सत्कार करणे उचित होणार नाही,त्यामुळे नागरी सत्कार करण्याचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यास परवानगी द्यावी, असे प्रशासनाने आपल्या या प्रस्तावात नमूद केले आहे.