मुंबई : यंदाच्या आयपीएलमधली मुंबईची हाराकिरी सुरुच आहे. हैदराबादनं ठेवलेल्या ११९ रनचं आव्हानही मुंबईला पार करता आलं नाही. या मॅचमध्ये मुंबईचा ८७ रनवर ऑल आऊट झाल्यामुळे मुंबईचा ३१ रननी पराभव झाला आहे. यंदाच्या आयपीएलमधल्या ६ मॅचमध्ये मुंबईचा हा पाचवा पराभव आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी मुंबईचा रस्ता आणखी खडतर झाला आहे. ११९ रनचा पाठलाग करताना मुंबईला लागोपाठ धक्के बसत होते. हैदराबादच्या सिद्धार्थ कौलनं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर रशीद खान आणि बसील थंपीला प्रत्येकी २ विकेट मिळाल्या. संदीप शर्मा, मोहम्मद नबी आणि शकीब अल हसनला प्रत्येकी १ विकेट मिळाली. मुंबईकडून सूर्यकुमार यादवनं सर्वाधिक रन केल्या. हार्दिक पांड्यानं १७ बॉल खेळून फक्त ३ रन केल्या.
हैदराबादच्या टीमला २० ओव्हरमध्ये फक्त ११८ रनपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे मुंबईला विजयासाठी ११९ रनची आवश्यकता आहे. या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय मुंबईच्या बॉलरनी योग्य ठरवला आणि सुरुवातीपासूनच हैदराबादला झटके दिले. मुंबईकडून मिचेल मॅकलेनघन, हार्दिक पांड्या आणि मयंक मार्कंडेला प्रत्येकी २ विकेट मिळाल्या. तर जसप्रीत बुमराह आणि मुस्तफिजूर रहमानला प्रत्येकी १ विकेट घेण्यात यश आलं. हैदराबादच्या टीमला संपूर्ण २० ओव्हरही खेळता आल्या नाहीत. १८.४ ओव्हरमध्येच हैदराबादची टीम ऑल आऊट झाली. हैदराबादकडून केन विलियमसन आणि युसुफ पठाणनं सर्वाधिक २९ रन केल्या.