Yuzvendra Chahal displeasure On RCB: आयपीएलमुळे अनेक युवा खेळाडूंना आपलं कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे अनेक नवनवीन खेळाडू सर्वांसमोर येत असतात. भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (royal challengers bangalore) 2022 च्या आयपीएलच्या मेगा लिलावात त्याला विकत घेतलं नाही. त्यामुळे क्रीडा जगतात आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. अशातच आता युझी चहलने (Yuzvendra Chahal) एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत.
माझा प्रवास 2014 मध्ये सुरू झाला होता. संघातून बाहेर पडल्यानंतर मला नक्कीच वाईट वाटलं. पहिल्याच सामन्यापासून विराट कोहलीने माझ्यावर विश्वास दाखवला. युझीने खूप पैसे मागितले असावेत, असं म्हणणारे लोक मी पाहिले आहेत. संघातून बाहेर पडल्यावर वाटणारी भावना अतिशय वाईट होती. कारण मी फ्रँचायझीसाठी 8 वर्षे खेळत होतो. मी काही मागितलं नाही. मी किती सक्षम आहे हे मला माहीत आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आरसीबीचा एक कॉलही नाही, त्यांनी मला काहीही सांगितलं नाही, असं म्हणत युझीने नाराजी व्यक्त केली आहे.
मी बंगळुरूसाठी तब्बल 140 सामने खेळलो, पण मला त्यांच्याकडून योग्य संवाद मिळाला नाही. मला वचन दिलं होतं की ते माझ्यासाठी सर्वकाही करतील, तोपर्यंत मी ठीक होतो. त्यानंतर मला खूप राग आला. मी त्याच्यासाठी 8 वर्षे खेळलो. चिन्नास्वामी स्टेडियम माझं आवडतं मैदान आहे, असंही चहल सांगतो.
मात्र, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाल्यानंतर माझ्यासोबत एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे मी डेथ बॉलर बनलो. मी डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करायला सुरुवात केली. आरसीबीमध्ये मी जास्तीत जास्त 16 वी किंवा 17 वी ओव्हर करायचो. राजस्थानमध्ये, मी डेथ बॉलर झालो आणि माझी क्रिकेटची वाढ 5 ते 10 टक्क्यांनी वाढली, असं चहल आत्मविश्वासने सांगतो.
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (royal challengers bangalore) संधी दिली नसल्याने राजस्थान रॉयल्सने चहलला संघात स्थान दिलं. त्यामुळे संघ अधिक बळकट झाल्याचं दिसून आलं. राजस्थानने 2022 मध्ये फायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र, मागील हंगामात राजस्थानला काही खास कामगिरी करता आली नाही.