क्रिकेटविश्व म्हटलं तर नवे सामने, रेकॉर्ड यासह रोज नवनवे वादही निर्माण होत असतात. सध्या पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज मोहम्मद आसिफने केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. मोहम्मद आसिफने थेट आपल्याच पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमला आव्हान दिलं आहे. आपण आजही बाबर आझमला मेडन ओव्हर टाकू शकतो असा दावा मोहम्मद आसिफने केला आहे. एकीकडे वर्ल्डकपच्या निमित्ताने बाबर आझमकडे सर्वांच्या नजरा असताना आपल्याच देशातील माजी खेळाडूने केलेल्या विधानामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ माजली आहे. मोहम्मद आसिफच्या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना, बाबर आझमच्या वडिलांनीही त्याला उत्तर दिलं आहे.
मोहम्मद आसिफने केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना आझम सिद्दीकी यांनी दावा केला आहे की, आपल्या मुलाने आदरापोटी अंडर 16 दरम्यान मोहम्मद आसिफच्या गोलंदाजीवर एकही फटका मारला नव्हता. याचं कारण त्याने संघ व्यवस्थापनाला ZTBL ट्रायदरम्यान बाबरला संघात स्थान देण्यास सांगितलं होतं. मोहम्मद आसिफने बाबर आझमचा खेळ पाहिल्यानंतरच ही विनंती केली होती.
दरम्यान आझम सिद्दीकी यांनी चाहत्यांना मोहम्मद आसिफच्या विधानावर जास्त व्यक्त न होण्याची आणि त्याच्यावर टीकेचा भडीमार न करण्याची विनंती केली आहे.
Babar Azam father Azam Siddiqui's heartfelt note and response to Mohammad Asif's statement
- Babar Azam scored 84 runs and hit 11 fours against Mohammad Asif's team when he was playing U16 cricket
- Babar was disappointed as Asif said something to him after getting him out… pic.twitter.com/QIEguaQju8— Farid Khan (@_FaridKhan) September 24, 2023
"ट्रायलदरम्यान फक्त दोन चेंडू खेळलेला असतानाही मी बाबर आझमची निवड केली होती. तुम्ही त्याच्या वडिलांना विचारु शकता. मी ZTBL ट्रायदरम्यान त्याची निवड केली होती. मी त्याला फार चांगले गुण दिले होते. देशातील तो सर्वोत्तम फलंदाजांपैकी आहे. पण पॉवर-प्ले दरम्यान तो चांगला खेळत नाही आणि रिझवानवर दबाव येतो. मी आजही टी-20 मध्ये बाबर आझमला मेडन ओव्हर टाकू शकतो. जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर तो अजिबात खेळू शकत नाही," अशी पोस्ट मोहम्मद आसिफने एक्सवर शेअर केली आहे.
मोहम्मद आसिफने त्याच्या कारकिर्दीत 23 कसोटी, 38 एकदिवसीय आणि 11 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान तिन्ही प्रकारात त्याने एकूण 165 विकेट्स घेतले आहेत. सर्वात घातक गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जात होतं. 2010 मध्ये पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्यात स्पॉट-फिक्सिंग स्कॅममध्ये सामील झाल्यानंतर त्याची कारकीर्द अचानक संपुष्टात आली आणि करिअर संपलं.
पाकिस्तान 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या विश्वचषक 2023 मध्ये सहभागी होणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ 29 सप्टेंबर रोजी न्यूझीलंड आणि 3 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यांनी त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर, 6 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याने त्यांच्या लीग सामन्यांची सुरुवात करतील.