close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

१० वर्षानंतर श्रीलंकेची टीम पाकिस्तान दौऱ्यावर जाणार

पाकिस्तानमध्ये अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन होणार आहे.

Updated: Sep 12, 2019, 10:30 AM IST
१० वर्षानंतर श्रीलंकेची टीम पाकिस्तान दौऱ्यावर जाणार

मुंबई : पाकिस्तानमध्ये अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन होणार आहे. पाकिस्तान दौऱ्यासाठी श्रीलंकेने त्यांच्या टीमची घोषणा केली आहे. या सीरिजमध्ये ३ टी-२० आणि ३ वनडे मॅचची सीरिज होणार आहे. २००९ साली श्रीलंकेच्या टीमवर पाकिस्तानमध्ये जीवघेणा दहशतवादी हल्ला झाला होता, यानंतर श्रीलंकेची टीमने पाकिस्तानचा संपूर्ण दौरा केला नव्हता.

पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजसाठी श्रीलंकेने टीमची घोषणा केली असली तरी, त्यांच्या प्रमुख १० खेळाडूंनी या सीरिजमधून माघार घेतली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये जायला नकार दिला, असं श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांनी सांगितलं आहे. दिमुथ करुणारत्ने, लसिथ मलिंगा, एंजलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डिसिल्वा, थिसारा परेरा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांनी पाकिस्तानमध्ये जायला नकार दिला.

२७ सप्टेंबरपासून श्रीलंकेच्या पाकिस्तान दौऱ्याला सुरुवात होणार आहे. २७ सप्टेंबरला पहिली वनडे, २९ सप्टेंबरला दुसरी आणि २ ऑक्टोबरला तिसरी वनडे खेळवण्यात येईल. यानंतर ५, ७ आणि ९ ऑक्टोबरला टी-२० मॅच होतील. तीन वनडे कराचीमध्ये तर टी-२० मॅच लाहोरच्या गडाफी स्टेडियममध्ये होतील.

पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी श्रीलंकेने वनडे टीमचं नेतृत्व लाहिरु थिरमानेला आणि टी-२०चं नेतृत्व दासुन शनाकाला दिलं आहे.

२००९ साली श्रीलंकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा दौरा करण्यासाठी कोणतीच टीम तयार नव्हती. २०१५ साली झिम्बाब्वेने पाकिस्तानचा दौरा केला होता. तर २०१७ साली श्रीलंकेने पाकिस्तानमध्ये १ टी-२० मॅच खेळली होती. २०१८ साली वेस्ट इंडिजने पाकिस्तानमध्ये ३ टी-२० मॅचची सीरिज खेळली होती.

श्रीलंकेची वनडे टीम

लाहिरु थिरमान(कर्णधार), दानुष्का गुणतिलका, सदीरा समरविक्रमा, आविष्का फर्नांडो, ओशादा फर्नांडो, शेहान जयसूर्या, मिनोद बनुका, एंजलो परेरा, वानिंदु हसरंगा, लक्षण संदाकन, नुवान प्रदीप, इसरु उडाना, कसुन रजीता, लाहिरु कुमारा

श्रीलंकेची टी-२० टीम

दासुन शनाका (कर्णधार), दानुष्का गुणतिलका, सदीरा समरविक्रमा, आविष्का फर्नांडो, ओशादा फर्नांडो, शेहान जयसूर्या, एंजलो परेरा, भानुका राजपक्षे, मिनोद बनुका, लाहिरु मदुशंका, वानिंदु हसरंगा, लक्षण संदाकन, नुवान प्रदीप, इसरु उडाना, कसुन रजीता, लाहिरु कुमारा