पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पाकिस्तानला भालाफेकमध्ये गोल्ड मेडल जिंकवून देणारा अरशद नदीम सध्या चर्चेत आहे. तब्बल 32 वर्षांनी अरशदमुळे पाकिस्तानला ऑलिम्पिकमध्ये प्रथमच गोल्ड मेडल जिंकता आले, त्यामुळे सध्या अरशदवर सर्व स्थरातून कौतुक आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे. अरशद गोल्ड मेडल जिंकल्यावर त्याच्या सासऱ्यांनी त्याला एक म्हैस भेट म्हणून दिली. मात्र यावरून एका मुलाखतीत त्याने आपल्या पत्नी समोरच सासऱ्यांना उपहासात्मक टोमणा मारला.
पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक म्हणजेच जेवलिन थ्रोमध्ये अरशद नदीमने तब्बल 92.97 मीटर लांब थ्रो फेकून रेकॉर्ड केला आहे. त्याने भारताच्या नीरज चोप्राला सुद्धा मागे टाकले, ज्यामुळे भारताला भालाफेकीत रौप्य पदावर समाधान मानावे लागले. त्याच्या या कामगिरीमुळे संपूर्ण जगभरात त्याचे कौतुक होत असून यामुळे ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानची कामगिरी सुद्धा उंचावली आहे. अरशद नदीमने गोल्ड मेडल जिंकल्यावर त्याच्या सासऱ्यांनी त्याला म्हैस भेट देणार असल्याचे जाहीर केले. खेडेगावात म्हैस भेट म्हणून देणे हे 'मौल्यवान' आणि 'सन्मानजनक' मानले जाते. परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात अरशद एका मुलाखती दरम्यान त्याच्या सासऱ्यांनी दिलेल्या भेटीची मस्करी करताना दिसत आहे.
पाकिस्तानच्या एका पत्रकाराने गोल्ड मेडल विजेता अरशद नदीम आणि त्याच्या पत्नीची मुलाखत घेतली. यावेळी पत्रकाराने अरशदला त्याच्या सासऱ्यांनी दिलेल्या म्हैशीबद्दल विचारले. तेव्हा अरशद म्हणाला, "पत्नीने मला ही गोष्ट सांगितली. तेव्हा मी म्हणालो, काय म्हैस? त्यांनी मला 5-6 एकर जमीन दिली पाहिजे होती. पण म्हैस सुद्धा ठीक आहे. देवाच्या कृपेने ते खूप श्रीमंत आहेत आणि त्यांनी एक म्हैस दिली" .
ارشد ندیم کا اپنے سسر سے معصومانہ مطالبہ#11thHour pic.twitter.com/eO2gATPyfL
— Waseem Badami (@WaseemBadami) August 15, 2024
अरशद नदीमने दिलेल्या प्रतिक्रियेवर पाकिस्तानी पत्रकार हसू लागला. अरशद नदीमचे सासरे हे गावात राहतात, तसेच त्यांना चार मुलं आणि तीन मुली आहेत. अरशद नदीमचे सासरे मुहम्मद नवाज यांनी सांगितले की त्यांनी परंपरा आणि नदीमच्या गावातील जीवनाशी निगडित गोष्टीमुळे त्याला म्हैस भेट दिली.
मुहम्मद नवाज यांची मुलगी आयशा हिचे लग्न नदीम सोबत झाले आहे.