सेंच्युरिअन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली नाही. या दोन्ही टेस्टमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर रहाणेला संधी न दिल्याबद्दल कॅप्टन विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीवर जोरदार टीका झाली. या सगळ्या टीकेवर आता रवी शास्त्रींनी प्रतिक्रिया दिली आहे.
रहाणे नेटमध्ये सराव करतानाही संघर्ष करताना दिसला. तर रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये होता, असं रवी शास्त्री एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणला आहे. रोहित शर्माची टेस्टमधली सरासरी चांगली होती. तसंच त्यानं मागच्या वर्षी वनडेमध्येही १२०० रन्स बनवल्या होत्या. तर २०१७ मध्ये अजिंक्यची सरासरी फक्त ३० होती, असा दाखला रवी शास्त्रीनं दिला.
केप टाऊनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये रोहित दोन्ही इनिंगमध्ये २१-२१ रन्स बनवून आऊट झाला. तर सेंच्युरिअनच्या दुसऱ्या टेस्टमध्ये रोहितनं पहिल्या इनिंगमध्ये १० आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ७४ बॉल्समध्ये ४७ रन्सची खेळी केली. या दोन्ही टेस्ट भारतानं गमावल्या.
जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये रोहितऐवजी अजिंक्यला संधी देण्यात आली. या संधीचं अजिंक्य रहाणेनं सोनं केलं. या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अजिंक्यनं ६८ बॉल्समध्ये महत्त्वपूर्ण ४८ रन्स केल्या. भुवनेश्वर कुमारबरोबर अजिंक्यनं महत्त्वाची पार्टनरशीप केली. या मॅचमध्ये भारताचा ६३ रन्सनं शानदार विजय झाला.
जोहान्सबर्गमधल्या विजयानंतर पहिल्या वनडेमध्येही भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहलीनं शतक केलं. याचबरोबर अजिंक्य रहाणेनंही ८६ बॉल्समध्ये ७९ रन्सची खेळी केली. परदेशातली अजिंक्य रहाणेची कामगिरी बघता त्याला पहिल्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये खेळवलं पाहिजे होतं, अशी प्रतिक्रिया क्रिकेट समिक्षकांनी दिली आहे.