भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. हैदरबादमध्ये दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांची ही मालिका असून विराट कोहलीच्या जागी रजत पाटीदारला संधी देण्यात आली आहे. विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव आपल्याला पहिल्या दोन सामन्यांमधून वगळण्याची विनंती बीसीसीआयकडे केली होती. रोहित शर्माने पहिल्या सामन्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली.
इंग्लंडचा फिरकी गोलंदाज शोएब बसिरला भारतात येता न आल्याबद्दल विचारण्यात आलं असता रोहित म्हणाला की, "मला त्याच्यासाठी वाईट वाटत आहे. अशा प्रकारची स्थिती कोणासाठीही सोपी नसते. दुर्दैवाने मी व्हिसा कार्यालयात बसत नाही, ज्यामुळे तुम्हाला सविस्तर माहिती देऊ शकत नाही. तो लवकर येईल अशी आशा आहे".
पाहुण्या संघाने भारतात मालिका जिंकून 12 वर्षं झाली आहेत. 2012 मध्ये इंग्लंड संघानेच ही कामगिरी केली होती. त्या मालिकेतील तीन खेळाडू फलंदाज जॉनी बेअरस्टो, जो रूट आणि वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सध्याच्या इंग्लंड संघाचा भाग आहेत. त्यातच इंग्लंड संघ सध्या बेजबॉल पद्धतीने खेळत असून, भारतीय संघासमोर त्यांना रोखण्याचं आवाहन आहे. दरम्यान याबद्दल रोहित शर्माला विचारण्यात आलं असता तो म्हणाला की, "आम्ही आमच्या पद्धतीचं क्रिकेट खेळत आहोत. आम्ही संघ म्हणून नेमकं काय करायचं आहे याबद्दल स्पष्ट आहोत".
Question: What are your thoughts on Bazball?
Rohit Sharma said "We look to play our cricket. I am focused on what we want to do as a team". [JioCinema] pic.twitter.com/MkP5Lj5tWV
— Johns. (@CricCrazyJohns) January 24, 2024
कसोटी मालिकेत भारताचा हुकमी एक्का विराट कोहली खेळणार नसून, संघाला त्याची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. विराट कोहली संघासह हैदराबादमध्ये पोहोचला होता, पण काही कारणास्तव तो माघारी परतला. यानंतर चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीच्या जागी कोणत्या खेळाडूची निवड होणार यासंबंधी वेगवेगळे तर्क लावले जात होते. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, बी साई सुदर्शन, सरफराज खान आणि रजत पाटीदार यांची नावं चर्चेत होती. अखेर रजत पाटीदारच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
रजत पाटीदारला संधी देण्यासंबंधी रोहित शर्माने भाष्य केलं आहे. पत्रकार परिषदेत त्याने यामागील हेतू स्पष्ट करताना सांगितलं की, "आम्ही विराट कोहलीच्या अनुपस्थितीत एखाद्या अनुभवी खेळाडूला संघाला संधी देण्याचा विचार केला. जर तरुण खेळाडूला संधी दिली तर थेट परदेशातील स्थितीत ते उघडे पडू नयेत अशी आशा असते". "अनेकदा तेथील स्थितीची जाणीव असणाऱ्या काही खेळाडूंना संघात स्थान द्यावं लागतं," असंही ते म्हणाले.
रजत पाटीदारने डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून पदार्पण केलं होतं. उद्या तो आपला पहिला कसोटी सामना खेळणार आहे. प्रथम श्रेणीत 46 च्या सरासरीने त्याने 4000 धावा केल्या आहेत.