मुंबई : आयपीएलमध्ये बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ५ विकेटने विजय झाला. हार्दिक पांड्याने १६ बॉलमध्ये केलेल्या ३७ रनच्या फटकेबाजीमुळे मुंबईने हा सामना १ ओव्हरआधीच खिशात टाकला. हार्दिक पांड्याच्या या कामगिरीनंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने त्याचं कौतुक केलं आहे.
'हार्दिकच्या चांगल्या कामगिरीमुळे टीमला विजय मिळत आहे. आयपीएलआधी त्याला जास्त वेळ मिळाला नव्हता. दुसऱ्यापेक्षा स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हार्दिक पांड्या भुकेला होता. त्याला बॅट आणि बॉलने चांगलं प्रदर्शन करायचं होतं,' असं रोहित म्हणाला.
लसिथ मलिंगाच्या कामगिरीमुळे मुंबईनं बंगळुरूला १७० रनपर्यंत रोखलं. मलिंगाने बंगळुरूच्या ४ विकेट घेतल्या. 'मलिंगाची कामगिरी आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मागच्या काही मॅचमध्ये मलिंगाची कमी आम्हाला जाणवली. वानखेडे स्टेडियमवर शेवटच्या काही ओव्हरमध्ये बॉलिंग करणं कठीण असतं. बंगळुरूला १७० रनवर रोखण्याचं श्रेय बॉलरना जातं,' अशी प्रतिक्रिया रोहितने दिली.
वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवरही रोहितने भाष्य केलं. 'वानखेडेची खेळपट्टी कशी आहे, हे मला अजूनही कळलेलं नाही. बहुतेकवेळा या मैदानात आव्हानाचा पाठलाग करणं सोपं असतं. पण ही मॅच वेगळी झाली. जर खेळपट्टी अशीच राहिली तर आमी आव्हानाचा पाठलाग करण्याची इच्छा नसेल', असं वक्तव्य रोहितने केलं. बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईच्या बॅट्समनना स्पिनरनी त्रास दिला.