IPL 2023: Ruturaj Gaikwad चा तो षटकार ठरला तब्बल 5 लाख रुपयांचा! जाणून घ्या नेमकं घडलं काय

Ruturaj Gaikwad 5 Lakh Rs Six: सामन्यातील पाचव्या षटकामध्ये ऋतुराजने 3 षटकार लगावले. या एका षटकात त्याने 300 हून अधिकच्या स्ट्राइक रेटने 20 धावा कुटल्या.

Updated: Apr 5, 2023, 01:28 PM IST
IPL 2023: Ruturaj Gaikwad चा तो षटकार ठरला तब्बल 5 लाख रुपयांचा! जाणून घ्या नेमकं घडलं काय title=
Ruturaj Gaikwad (Photo - Twitter/ChennaiIPL वरुन साभार)

Ruturaj Gaikwad 5 Lakh Rs Six: कोट्यावधी रुपये मोजून इंडियन प्रिमियर लिगमधील संघ खेळाडूंना आपल्या संघात घेतात. अर्थात जास्त किंमत मोजलेला प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करतोच असं नाही. मात्र काही खेळाडू खरोखरच त्यांच्यासाठी मोजलेल्या पैशांचा मोबदला आपल्या संघ देतात. असाच एक खेळाडू आहे चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड! यंदाच्या पर्वात ऋतुराजने पहिल्या सामन्यापासूनच उत्तम कामगिरी केली आहे. मात्र 3 मार्च रोजी झालेल्या सामन्यात ऋतुराजचा एक षटकार तब्बल 5 लाखांचा होता असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र हे खरं आहे. पण नक्की घडलंय काय हे जाणून घेऊयात...

त्या षटकाराने पडला डेंट

3 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सदरम्यान झालेल्या सामन्यात ऋतूराज गायकवाडने 31 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या. या खेळीदरम्यान 3 चौकार आणि 4 षटकार लगावले. यापैकी 3 षटकार त्याने पाचव्या षटकामध्येच लगावले. यापैकी एक षटकार तर चक्क 5 लाखांचा ठरला. कारण हा षटकार ज्या जागी लॅण्ड झाला ती फारच खास होती. झालं असं की, गायकवाडने लगावलेला हा षटकार सीमेपलीकडे उभ्या असलेल्या टाटाच्या टियागो ईव्हीवर पडला. या चेंडूचा वेग इतका होता की या गाडीच्या छप्पराला डेंट पडला. 

6 चेंडूत 20 धावा

आयपीएलमधील गुजरातविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 50 चेंडूंमध्ये 92 धावा करणाऱ्या गायकवाडने दुसऱ्या सामन्यातही उत्तम कामगिरी केली. या सामन्यात पहिल्या 25 चेंडूंमध्ये गायकवाडने 200 च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी करत 50 ची धावसंख्या गाठली. या खेळीमध्ये त्याने पहिल्या 12 चेंडूंमध्ये 20 धावा केल्या. त्यानंतर त्याने पुढील 6 चेंडूंमध्ये 20 धावा केल्या. पाचव्या षटकामध्ये त्याने कृष्णाप्पा गौतमला 3 षटकार लगावले. 

नेमकं घडलं काय?

या षटकामधील पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुढच्याच चेंडूवर गायकवाडने सरळ षटकार लगावला. त्यानंतर पुन्हा एक चेंडू निर्धाव गेला. मात्र नंतर षटकातील तिसऱ्या चेंडूवर गायकवाडने पुन्हा लाँग ऑफवरुन षटकार मारला. पुढच्या चेंडूवर दिपक हुडाने केलेल्या भन्नाट फिल्डींगमुळे संभाव्य चौकार वाचवण्यात लखनऊच्या संघाला यश आलं. मात्र याच षटकातील शेवटच्या चेंडूवर गायकवाडने षटकार लगावला. त्याने वाईड लाँग ऑफवरुन हा षटकार लगावत एका षटकात 20 धावा कुटल्या.

कोणाला मिळणार 5 लाख

गायकवाडचा शेवटचा षटकार हा थेट सीमारेषेपलीकडील टाटा टियागो ईव्हीच्या छप्परावर पडला. मात्र याचमुळे आता टाटा कंपनी 5 लाख रुपयांची मदत एका खास कामासाठी करणार आहे. प्रसारमाध्यमांमधील वृत्तानुसार कोणत्याही फलंदाजाने या गाडीला चेंडू लागेल असा फटका मारला की टाटा मोटर्स 5 लाख रुपयांची मदत कर्नाटकमधील कॉफी बियांच्या संवर्धनाच्या कामासाठी देणार आहे. त्यामुळेच ऋतुराजच्या या षटकारामुळे आता या कामासाठी टाटा कंपनी 5 लाख रुपये देणार आहे.