मुंबई : सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. २३ ऑक्टोबरला गांगुली अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहे. अध्यक्ष झाल्यानंतर सौरव गांगुलीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गांगुलीचा जुना सहकारी सचिन तेंडुलकरनेही दादाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबतचं एक ट्विट सचिनने केलं आहे. या ट्विटमध्ये सचिनने सौरवचा उल्लेख दादी असा केला आहे.
'बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दादीला शुभेच्छा. तु नेहमीप्रमाणेच भारतीय क्रिकेटची सेवा करशील, यावर मला विश्वास आहे. नव्या टीमला शुभेच्छा,' असं ट्विट सचिनने केलं आहे.
Congrats on being elected the @BCCI President, Dadi.
I am sure you will continue to serve Indian Cricket like you always have!
Best wishes to the new team that will take charge. pic.twitter.com/ucGnOi0DRC— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 15, 2019
सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्यात वनडेत सर्वाधिक ओपनिंग पार्टनरशीपचा विक्रम आहे. या दोघांनी १३६ इनिंगमध्ये टीम इंडियासाठी ओपनिंग करताना दोघांनी ६,६०९ रन केले, यामध्ये २१ शतकी आणि २३ अर्धशतकी पार्टनरशीपचा समावेश आहे.
गांगुलीने सोमवारी बीसीसीआयचा अध्यक्ष होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. गांगुली वगळता या पदासाठी कोणीच अर्ज भरलेला नाही, त्यामुळे २३ तारखेला गांगुलीची निवड बिनविरोध होणार आहे. सप्टेंबर २०२० पर्यंतच गांगुली अध्यक्षपदावर कायम राहू शकतो. बीसीसीआयच्या नियमांनुसार एक व्यक्ती प्रशासकीय पदावर ६ वर्षांपेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. गांगुली हा २०१५ पासून बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. त्यामुळे त्याला थोड्या कालावधीसाठी अध्यक्षपदापासून लांब राहवं लागणार आहे.