Shoaib Akhtar On IND vs PAK : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळवलं अन् पाकिस्तानची टीम सैरभैर झाल्याचं दिसून येतंय. आयसीसी ट्रॉफीमध्ये (ICC ODI World Cup) भारत नेहमीच पाकिस्तानवर वरचढ राहिलाय. मात्र, आम्हीच जिंकणार म्हण्याची पाकिस्तानची जुनी सवय काही जाणार नाही... मागील 12 वर्ष झालं पाकिस्तानचं एक गुऱ्हाळ गातोय. ते म्हणजे 2011 च्या वर्ल्ड कपचा बदला घेणार. पण पाकिस्तानच्या नशिबात ते सुख काही लिहिलेलं नाही. अशातच आता नेहमी पाकिस्तानची दुखती नस दाबून धरणाऱ्या शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) मोठं वक्तव्य केलं आहे.
आम्ही 2011 च्या विश्वचषकातील पराभवाचा बदला घेऊ आणि 2023 ची ट्रॉफी अहमदाबाद येथे जिंकू. आम्ही पाकिस्तानी आधीच याचा प्लॅन करत आहेत, असं शोएब अख्तर म्हणाला आहे. स्टार स्पोर्ट्सवर हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि शोएब अख्तर एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी अख्तरने पुन्हा भारताला हरवण्याचं सर्वांना स्वप्न दाखवलं आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावरील एकदिवसीय संघ पाकिस्तानसाठी हे विश्वविजेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी असल्याचं अख्तरने म्हटलंय. पाकिस्तानचा संघ भारतात पूर्णपणे एकटा पडेल. त्याच्यावर कोणताही दबाव राहणार नाही. यजमानपद भूषवताना भारतावर आपल्याच प्रेक्षकांसमोर खेळण्याचे दडपण असेल. आम्ही अधिक चांगले खेळू, असा विश्वास अख्तरने दाखवलाय.
आणखी वाचा - हॅरिस रौफने मोडला शोएब अख्तरचा 'तो' रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा चौथा पाकिस्तानी खेळाडू!
दरम्यान, विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. भारतीय संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे करणार आहे. त्याआधी भारत आणि पाकिस्तानचे संघ आशिया कपमध्ये दोनदा भिडणार आहे. 10 सप्टेंबरला इंडिया पाकिस्तान आमने सामने असतील तर फायनल देखील या दोन्ही संघांमध्ये होण्याची शक्यता आहे.