'या दोन खेळाडूंपासून राहुलला धोका'; गांगुलीचा इशारा

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी योग्य अशा काही ठराविक खेळाडूंमध्ये केएल राहुलचं नाव घेतलं जातं.

Updated: Sep 20, 2019, 12:43 PM IST
'या दोन खेळाडूंपासून राहुलला धोका'; गांगुलीचा इशारा title=

मुंबई : क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी योग्य अशा काही ठराविक खेळाडूंमध्ये केएल राहुलचं नाव घेतलं जातं. पण गेल्या काही दिवसांपासून केएल राहुल खराब फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधूनही राहुलला डच्चू देण्यात आला आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्येही राहुलला स्थान मिळालं नाही. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने केएल राहुलला धोक्याचा इशारा दिला आहे.

'श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे यांच्यामुळे राहुलवर दबाव वाढला आहे. या दोघांमुळे राहुलचा चौथा क्रमांकही धोक्यात आला आहे. श्रेयस अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरिजमध्ये उत्तम कामगिरी केली. त्यामुळे त्याला टी-२०मध्ये संधी मिळाली,' असं गांगुली म्हणाला.

'रोहित आणि शिखर धवन हे सध्या भारताचे सर्वोत्तम ओपनर आहेत. त्यामुळे राहुलला खालच्या क्रमांकावर बॅटिंग करावी लागेल. खराब कामगिरीमुळे तो टेस्ट टीमबाहेर गेला आहे. आता वनडेमध्ये चौथ्या क्रमांकासाठी राहुलला श्रेयस अय्यर आणि मनिष पांडेकडून आव्हान मिळत आहे,' असं वक्तव्य गांगुलीने केलं.

'दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये भारताचं पारडं जड आहे. दक्षिण आफ्रिकेला त्यांचं स्थानिक क्रिकेट मजबूत करावं लागेल. काही काळापूर्वी दक्षिण आफ्रिकेतून चांगले खेळाडू यायचे, आता असं होत नाही. इतर टीमप्रमाणे दक्षिण आफ्रिकेच्या कामगिरीमध्येही घसरण झाली आहे', असं मत गांगुलीने मांडलं.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तिसरी टी-२० मॅच रविवारी बंगळुरूमध्ये होणार आहे. ३ मॅचच्या सीरिजमध्ये भारत १-०ने आघाडीवर आहे. पहिली टी-२० मॅच पावसामुळे रद्द झाली होती, तर दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला होता.