IPL 2023 Playoff Scenario: ...तर सगळा गेमच पलटणार! RCB आणि MI मध्ये होणार मुख्य लढत

IPL 2023 Playoff Scenario: सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) पराभव केला तर विराट कोहलीच्या बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाचं टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्याच्या आशा मावळू शकतात. बंगळुरु संघाला जर प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर नेमकं काय गणित आहे ते समजून घ्या..  

शिवराज यादव | Updated: May 18, 2023, 03:11 PM IST
IPL 2023 Playoff Scenario: ...तर सगळा गेमच पलटणार! RCB आणि MI मध्ये होणार मुख्य लढत title=

IPL 2023 Playoff Scenario: आयपीएलचा हंगाम आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचू लागला असून दुसरीकडे गुजरात टायटन्स वगळता एकाही संघाने प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवलेलं नाही. त्यातच आज होणाऱ्या बंगळुरु आणि हैदराबाद सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे. या सामन्यातून येणारा निकाल बंगळुरुचं भवितव्य ठरवू शकतो. बंगळुरु संघाने 12 सामने खेळले असून 12 गुण मिळवले आहेत. गुणतालिकेत बंगळुरु संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे. 

या आयपीएलमध्ये बंगळुरु संघाचा प्रवास फारच रंजक राहिला आहे. त्यातही आता त्यांना आगामी दोन्ही सामने जिंकण्याची गरज आहे. तसं झाल्यास त्यांना प्ले-ऑफमध्ये जागा मिळू शकते. जर आज बंगळुरुने हैदराबादच पराभव केला तर प्ले-ऑफमधील त्यांचं आव्हान कायम असेल. मागील सामन्यात गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर  बंगळुरुने राजस्थान रॉयल्सचा दारुण पराभव केला होता. 

अद्याप दोन सामने शिल्लक असल्यान बंगळुरु संघाकडे आपली गुणसंख्या 16 करण्याची संधी आहे. बंगळुरु आज हैदराबादशी भिडणार असून, पुढील सामना गुजरातसोबत होणार आहे. गुणसंख्या 16 वर नेण्यासाठी बंगळुरुला हे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. पंजाब किंग्सने दिल्लीचा पराभव केला असल्याने बंगळुरु संघ दोन्ही सामने जिंकत सहजपणे प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवू शकतो. 

सध्या बंगळुरुसमोर फक्त मुंबई इंडियन्सचं आव्हान आहे. मुंबईने जर आगामी सामना जिंकला तर त्यांची गुणसंख्या 16 होईल. यामुळे मुंबई आणि बंगळुरु यांच्यात मुख्य स्पर्धा असेल. पण बंगळुरुचा रन-रेट पाहता त्यांना जास्त संधी आहे. 

पण जर बंगळुरुने शेवटचे दोन्ही सामने गमावले तर मात्र त्यांच्यासमोर मोठं संकट उभं राहू शकतं. दोन्ही सामन्यात पराभव झाल्यास बंगळुरुची गुणसंख्या 14 असेल. अशा स्थितीत ते राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स आणि कोलकाचा नाईट रायडर्स यांच्या प्लेऑफमधील आशा जिवंत ठेवतील. तसं झाल्यास रन-रेटच्या आधारेच शेवटचे टॉप 4 संघ ठरवले जातील. 

पण याउलट गुणतालिकेत तळाला असलेल्या हैदराबादचा पराभव करणं बंगळुरुसाठी महत्त्वाचं आहे. याशिवाय रन-रेटही कामय ठेवणं त्यांच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. 

दिल्ली कॅपिटल्सने वाढवली चेन्नईची चिंता

बुधवारी पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर प्ले-ऑफची स्पर्धा आणखीनच रोमांचक झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ स्पर्धेतून बाहेर झाला असला तरी त्याने दुसऱ्या संघांची चिंता वाढवली आहे. दिल्ली कॅपिटल्सने केलेल्या खराब कामगिरीचा सर्वाधिक फटका चेन्नई सुपरकिंग्सला बसू शकतो. 

 20 मे रोजी चेन्नई दिल्लीशी भिडणार आहे. सध्या चेन्नईची गुणसंख्या 15 असून दुसऱ्या स्थानावर आहेत. अद्याप चेन्नईने प्लेॉपमधील जागा नक्की केलेली नाही. दिल्लीविरोधातील सामना जर चेन्नईने जिंकला तर मात्र टॉप-4 मधील स्थान नक्की होईल. पण जर दिल्लीने पराभव केला तर मात्र त्यांचा प्रवास संपू शकतो. दिल्लीने चेन्नईचा पराभव केल्यास याचा फायदा लखनऊ सुपरजायंट्स, मुंबई इंडियन्स आणि बंगळुरुला होणार आहे.