close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

श्रीलंका टीमवर दहशतवादी हल्ल्याचा धोका, पाकिस्तान दौऱ्यावर टांगती तलवार

पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी श्रीलंकेने टीमची घोषणा केली आहे.

Updated: Sep 12, 2019, 10:54 AM IST
श्रीलंका टीमवर दहशतवादी हल्ल्याचा धोका, पाकिस्तान दौऱ्यावर टांगती तलवार

कोलंबो : पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी श्रीलंकेने टीमची घोषणा केली आहे. पण आता श्रीलंकेच्या टीमला पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची माहिती श्रीलंका सरकारला मिळाली आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या पाकिस्तान दौऱ्यावर टांगती तलवार आहे. श्रीलंकेचं सरकार हे पुन्हा एकदा पाकिस्तानमधल्या सुरक्षेची पाहणी करणार आहे, त्यानंतरच या दौऱ्यावर जायचं का नाही याचा विचार केला जाणार आहे. पण सध्या तरी हा दौरा रद्द झाला नसल्याचं श्रीलंका बोर्डाकडून सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानच्या दौऱ्यात श्रीलंकेच्या टीमवर हल्ला होऊ शकतो, असा इशारा श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मिळाला आहे. यानंतर श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाने या दौऱ्याचा पुनर्विचार करा, असा सल्ला दिला आहे. श्रीलंका पाकिस्तानमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० मॅचची सीरिज खेळणार आहे.

२७ सप्टेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. २७ सप्टेंबरला पहिली वनडे, २९ सप्टेंबरला दुसरी आणि २ ऑक्टोबरला तिसरी वनडे खेळवण्यात येईल. यानंतर ५, ७ आणि ९ ऑक्टोबरला टी-२० मॅच होतील. तीन वनडे कराचीमध्ये तर टी-२० मॅच लाहोरच्या गडाफी स्टेडियममध्ये होतील.

२००९ साली पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या टीमवर जीवघेणा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी श्रीलंका टीमच्या बसवर गोळीबार केला होता. यात ६ खेळाडू जखमी झाले होते.

श्रीलंकेच्या १० प्रमुख खेळाडूंनी या दौऱ्यातून सुरक्षेच्या कारणामुळे माघार घेतली आहे. दिमुथ करुणारत्ने, लसिथ मलिंगा, एंजलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डिसिल्वा, थिसारा परेरा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांनी पाकिस्तानमध्ये जायला नकार दिला.

२००९ साली श्रीलंकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा दौरा करण्यासाठी कोणतीच टीम तयार नव्हती. २०१५ साली झिम्बाब्वेने पाकिस्तानचा दौरा केला होता. तर २०१७ साली श्रीलंकेने पाकिस्तानमध्ये १ टी-२० मॅच खेळली होती. २०१८ साली वेस्ट इंडिजने पाकिस्तानमध्ये ३ टी-२० मॅचची सीरिज खेळली होती.

श्रीलंकेची वनडे टीम

लाहिरु थिरमान(कर्णधार), दानुष्का गुणतिलका, सदीरा समरविक्रमा, आविष्का फर्नांडो, ओशादा फर्नांडो, शेहान जयसूर्या, मिनोद बनुका, एंजलो परेरा, वानिंदु हसरंगा, लक्षण संदाकन, नुवान प्रदीप, इसरु उडाना, कसुन रजीता, लाहिरु कुमारा

श्रीलंकेची टी-२० टीम

दासुन शनाका (कर्णधार), दानुष्का गुणतिलका, सदीरा समरविक्रमा, आविष्का फर्नांडो, ओशादा फर्नांडो, शेहान जयसूर्या, एंजलो परेरा, भानुका राजपक्षे, मिनोद बनुका, लाहिरु मदुशंका, वानिंदु हसरंगा, लक्षण संदाकन, नुवान प्रदीप, इसरु उडाना, कसुन रजीता, लाहिरु कुमारा