श्रीलंकेच्या हेराथची निवृत्ती, शेवटच्या टेस्टमध्ये हेडली-कपिलचं रेकॉर्ड तोडणार!

श्रीलंका क्रिकेट टीमचा सर्वात अनुभवी खेळाडू रंगना हेराथनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Updated: Oct 22, 2018, 05:14 PM IST
श्रीलंकेच्या हेराथची निवृत्ती, शेवटच्या टेस्टमध्ये हेडली-कपिलचं रेकॉर्ड तोडणार! title=

कोलंबो : श्रीलंका क्रिकेट टीमचा सर्वात अनुभवी खेळाडू रंगना हेराथनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हेराथ नोव्हेंबरमध्ये इंग्लंडविरुद्धची पहिली टेस्ट खेळल्यानंतर निवृत्त होणार आहे. ही टेस्ट ६ नोव्हेंबरपासून गोल मैदानात खेळवण्यात येणार आहे. १९९० साली टेस्ट क्रिकेट सुरु करून आत्तापर्यंत खेळणारा हेराथ हा एकमेव क्रिकेटपटू आहे.

रंगना हेराथनं त्याची पहिली टेस्ट मॅचही याच मैदानात खेळली होती. या मैदानात १०० विकेट घेण्यासाठी हेराथला एका विकेटची गरज आहे. या विकेटनंतर हेराथ मुरलीच्या रेकॉर्डशी बरोबरी करेल. याच मैदानात हेराथनं २००९ साली पाकिस्तानविरुद्ध १० विकेट घेतल्या होत्या. त्या मॅचसाठी हेराथला अचानक बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी तो इंग्लंडमध्ये लीग क्रिकेट खेळत होता.

दुखापतीनं हेराथ हैराण

दुखापतीमुळे तिन्ही टेस्ट मॅचसाठी आपण उपलब्ध होऊ शकणार नाही, असं हेराथनं निवड समितीला सांगितलं होतं. २०१७ पासून हेराथनं ३ टेस्ट मॅचची एकही सीरिज पूर्ण खेळली नाही. गुडघ्याच्या दुखापतीमुळे हेराथ हैराण झाला आहे.

हेराथ हा टेस्ट क्रिकेटमधला सगळ्यात यशस्वी डावखुरा बॉलर आहे. एकूण ९२ टेस्टमध्ये हेराथनं ४३० विकेट घेतल्या आहेत. याचबरोबर ७१ वनडेमध्ये त्यानं ७४ विकेट आणि १७ टी-२०मध्ये १८ विकेट घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमधला हेराथ १० वा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर आहे.

हेडली-कपिलच्या रेकॉर्डजवळ

गोल टेस्टमध्ये हेराथला रिचर्ड हेडली आणि कपिल देव यांचं रेकॉर्ड तोडण्याची संधी आहे. हेडलीनं टेस्ट क्रिकेटमध्ये ४३१ विकेट घेतल्या तर कपिल देव यांच्या नावावर ४३४ विकेटची नोंद आहे. हेराथनं त्याच्या शेवटच्या टेस्टमध्ये २ विकेट घेतल्या तर हेडलीचं आणि ५ विकेट घेतल्या तर कपिल देव यांचं रेकॉर्ड तुटेल.