Sunil Gavaskar On Vinod Kambli Health: भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार असलेला विनोद कांबळी सध्या जोरदार चर्चेत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जिगरी मित्र असलेल्या विनोद कांबळीला सचिन इतकं यश क्रिकेटमध्ये मिळालं नाही. एकीकडे सचिन निवृत्तीनंतरही जाहिराती आणि इतर माध्यमांमधून कमाईपासून ते सामाजित स्तरावरही अव्वल स्थानी असतानाच त्याविरुद्ध गोष्ट आहे विनोद कांबळीची! काही दिवसांपूर्वीच मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क येथे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचे दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांच्या स्मृतीत उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या उद्घाटन समारंभाला दोन्ही क्रिकेटपटुंनी हजेरी लावलेली. मात्र प्रकृतीसंदर्भातील समस्यांमुळे विनोद कांबळी पूर्णपणे खचल्याचं दिसून आलं. कांबळीची ही अवस्था अनेकांना पहावली नाही. विनोद कांबळी बोलतानाही अडखळत होता. विनोद कांबळीचा हा अवतार पाहून त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र आता 1983 साली कपील देव यांच्या नेतृत्वाखाली देशाला पहिल्यांचा वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या संघाने विनोद कांबळीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
1983 चा वर्ल्ड कप विजेता संघ विनोद कांबळीला मदत करणार आहे, असं गावसरकरांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना सांगितलं. मात्र केवळ आर्थिक मदत देण्याऐवजी संघाला त्यांची काळजी घ्यायची असून त्याने स्वत:च्या पायावर पुन्हा उभं राहवं म्हणून आम्ही हवी ती मदत करायला तयार असल्याचं गावसकरांनी म्हटलं आहे. गावसकर यांनी कपील देव यांच्या नेतृत्वाखालील विश्वविजेता संघ सध्या आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या माजी खेळाडूंना मदत करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे. या खेळाडूंना पुन्हा त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी आम्ही मदत करायला तयार आहोत, असं गावसकर म्हणाले.
"तरुण खेळाडूंबद्दल 1983 चा संघ फार संवेदनशील आहे. ही पोरं आम्हाला आमच्या मुलांसारखी आहेत. आपल्या क्रिकेटपटूंबद्दल आम्हाला चिंता वाढते. खास करुन नशीब त्यांची साथ सोडतं तेव्हा काळजी अधिक वाढते. त्यामुळे आम्हाला केवळ त्यांची मदत करायची आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. 83 च्या या संघाला त्यांची काळजी घ्यायची आहे आणि त्यांना त्यांच्या पायावर पुन्हा उभं करण्यासाठी मदत करायची आहे," असं गावसकरांनी म्हटलं आहे.
1983 च्या विश्वविजेत्या संघातील सदस्य असलेल्या बलविंदर सिंग यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, कपील देव यांनी विनोद कांबळीला मदत करण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यांची एक अट असल्याचं सांगितलं आहे. विनोद कांबळीने आधी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल व्हावं त्यानंतरच आपण त्याला मदत करु असं कपील देव यांचं म्हणणं असल्याचं बलविंदर यांनी सांगितलं. कांबळी यापूर्वी 14 वेळा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला आहे. मात्र दरवेळेस तो अचानक तिथून निघून आला आहे.