मुंबई : टी20 विश्वचषक स्पर्धेत (ICC T20 World Cup) भारताला (Team India) पहिल्या दोनही सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. भारतीय फलंदाजांबरोबरच भारताच्या गोलंदाजांनाही समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तर भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेतला आली नाही. तर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात केवळ २ विकेट घेण्यात समाधान मानावं लागलं. अशाच भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यातही मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्तीवर (Varun Chakravarthy)चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
T20 विश्वचषकासाठी भारताच्या 15 जणांच्या संघात वरुण चक्रवर्तीला संघात संधी देण्यात आली. आपल्या मिस्ट्री गोलंदाजीने तो फलंदाजांना सळो की पळो करुन सोडेल अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली होती. विश्वचषक स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन सामने खेळले असून त्यात वरुण चक्रवर्तीचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये वरुणची मिस्ट्री गोलंदाजी सपशेल फ्लॉप ठरली, फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर सहज धावा केल्या. विश्वचषक स्पर्धेत खेळल्या गेलेल्या या सामन्यांमध्ये त्याला अश्विनपेक्षा जास्त पसंती देण्यात आली होती. पण वरुणने दोन्ही सामन्यात आठ षटकं टाकली आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषेदत अनुभवी आर अश्विनला (R Ashwin) संधी दिल्यास संघात सकारात्मक बदल होईल का असा प्रश्न जसप्रीत बुमराहला विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना बुमराहने म्हटलं, अश्विन अनुभवी गोलंदाज आहे, त्याच्या संघातील समावेशाने गोलंदाजीतील आक्रमकपणा वाढतो. पण स्पर्धेत दोन्ही वेळा भारताची पहिली फलंदाजी आली. दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणं काहीसं अवघड असतं, चेंडूला ग्रिप करणं गोलंदाजाला कठिण होऊन बसतं, असं बुमराहने म्हटलं.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय स्पिन गोलंदाज संघर्ष करताना दिसून आले. वरुण चक्रवर्तीने चार षटकांमध्ये २५ धावा दिल्या. तर रविंद्र जडेजाने दोन षटकातच २३ धावा दिल्या. दुसरीकडे न्यूझीलंडच्या स्पिन गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांसमोर आव्हान उभं केलं. न्यूझीलंडच्या इश सोढीने चार षटकांमध्ये केवळ १७ धावा देत दोन विकेट घेतल्या. तर मिशेल सॅंटनरने चार षटकात अवघ्या १५ धावा दिल्या.
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीनेही आर अश्विनच्या गोलंदाजीचं कौतुक केलं आहे. अश्विन एक अनुभवी गोलंदाजा आहे, तसंच त्याच्या गोलंदाजीत वैविध्य आहे, असं ब्रेट लीने म्हटलं आहे. भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये अश्विनला संधी देण्याची गरज असल्याचं ब्रेट लीने म्हटलं आहे.