T20 WC Indian Squads: टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्डकप खेळणार असून 15 खेळाडूंची नावं बीसीसीआयने जाहीर केली आहेत. आशिया कप स्पर्धेत खेळलेला संघच वर्ल्डकपसाठी असणार आहे. या संघात फक्त एक बदल करण्यात आला आहे. आवेश खान ऐवजी संघात जसप्रीत बुमराहला स्थान देण्यात आलं आहे. तर रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्याने आशिया कप स्पर्धेत अक्षर पटेलची निवड झाली होती. अक्षर पटेलची पुन्हा एकदा वर्ल्डकपसाठी निवड झाली आहे.
T20 विश्वचषकासाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, बी. कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
आशिया कप 2022 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत पाकिस्तान संघानं भारताचा पराभव करत अंतिम फेरीचा मार्ग रोखला होता. मागच्या वर्षीच्या टी 20 वर्ल्डकपमध्येही पाकिस्ताननं भारताचा पराभव करून बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. टी 20 वर्ल्डकप 2022 च्या सुपर 12 फेरीत भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत (India Vs Pakistan) होणार आहे. या सामन्यानंतर वर्ल्डकपमधील वाटचाल सुरु होणार आहे. सुपर 12 फेरीतून चार संघ उपांत्य फेरीत पोहोचणार आहेत. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे.
सुपर 12 फेरीत भारतीय संघाच्या गटात बांगलादेश, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका हे संघ आहेत. तर ग्रुप स्टेजमधून श्रीलंका, नामिबिया, यूएई, नेदरलँड, वेस्ट इंडिज, स्कॉटलँड, झिम्बाब्वे, आयर्लंड या आठ संघापैकी चार संघाची सुपर 12 फेरीत निवड होणार आहे. त्यापैकी दोन संघ भारतीय गटात समाविष्ट होईल. सुपर 12 फेरीत भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होईल.