T20 World Cup: रोहित शर्माने केला होता हार्दिकच्या नावाला विरोध, आगरकर म्हणाला 'संघात इतके खेळाडू...'

T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करणार आहे. यावेळी हार्दिक पांड्या उप-कर्णधार म्हणून खेळताना दिसेल.   

शिवराज यादव | Updated: May 14, 2024, 03:20 PM IST
T20 World Cup: रोहित शर्माने केला होता हार्दिकच्या नावाला विरोध, आगरकर म्हणाला 'संघात इतके खेळाडू...' title=

T20 World Cup: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा प्रवास अनपेक्षितपणे संपला आहे. मुंबई इंडियन्स आता प्लेऑफमध्ये पोहोचणार नाही हे स्पष्ट झालं आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघ आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. आयपीएल स्पर्धा सुरु होण्याच्या आधीपासूनच मुंबई इंडियन्स कर्णधारपदामुळे वादात अडकला होता. रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने चाहते नाराज असताना, मुंबई इंडियन्स संघातही सर्व काही आलबेल नव्हतं. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स संघातील चार खेळाडू टी-20 वर्ल्डकप संघात दिसणार आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. 

मुंबई इंडियन्स संघात कर्णधार बदलल्यानंतर वेळेसह सर्व काही सुरळीत होईल असं बोललं जात होतं. मात्र तसं होऊ शकलं नाही आणि संघाच्या कामिगिरीवर परिणाम झाला. कर्णधार हार्दिक पांड्याची वैयक्तिक कामगिरीही चांगली होऊ शकली नाही. त्यामुळे जेव्हा त्याला टी-20 वर्ल्डकप संघात स्थान मिळालं तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त कलें. दैनिक जागरणने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकरचा हार्दिक पांड्याच्या निवडीला विरोध होता. 15 सदस्यांच्या संघात हार्दिकला स्थान देण्यात ते फार उत्सुक नव्हते.

आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याने 13 सामन्यांमध्ये 144.93 च्या स्ट्राइक रेटने 200 धावा केल्या आहेत. तसंच 13 सामन्यांमध्ये 10.59 च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या आहेत. स्पर्धेच्या उत्तरार्धात त्याची सर्वाधिक चांगली गोलंदाजी केली.

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हार्दिक पांड्याची टी-20 वर्ल्डकपमध्ये निवड करण्यासाठी दबाव होता. तसंच या वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा टी-20 मधून निवृत्ती जाहीर करु शकतो. 

T20 विश्वचषक संघ निवडीनंतर रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा त्यांना हार्दिक पांड्या फॉर्ममध्ये नसतानाही त्याची निवड का केली? अशी विचारणा करण्यात आली होती. यावर अजित आगरकरने निवड समितीकडे हार्दिकच्या जागी दुसरा कोणताही पर्याय नव्हता असं सांगत निवडीमागील कारणाचा उलगडा केला होता. सध्या जे गुणी खेळाडू आहेत त्यांच्यात हार्दिकची जागा घेऊ शकेल असा कोणीही खेळाडू नाही असं अजित आगरकरने सांगितलं होतं.