What If India Lose T20 World Cup Final Sourav Ganguly Answers: भारतीय क्रिकेट संघ आठ महिन्यांच्या कालावधीत उद्या दुसऱ्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. बार्बाडोसच्या मैदानावर भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचा 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पराभव झाला होता. एकही सामना पराभूत न होता अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा अंतिम सामन्यातच पराभव झाला होता. या पराभवाचा उकटं काढण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. भारतीय संघांने दिर्घकाळापासून आयसीसीची एकही ट्रॉफी न जिंकल्याचा दुष्काळ संपवण्याची सुवर्णसंधीही भारताकडे आहे.
याच सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने एक मजेदार विधान केलं आहे. भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कपचा सामना पराभूत झाला तर रोहित शर्मा काय करु शकतो याबद्दल गांगुलीने भाष्य केलं आहे. पीटीआयशी बोलताना गांगुलीने, "तो दोन वर्ल्ड कप स्पर्धा खेळला आहे. या दोन्ही वेळेस त्याच्या नेतृत्वाखाली संघ एकही सामना पराभूत न होता अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. यावरुनच त्याच्या नेतृत्वगुणांची आणि कर्णधार म्हणून त्याच्याकडे असलेल्या कौशल्याची चुणूक लागते. मी बीसीसीआयचा अध्यक्ष असतानाच विराट कोहलीला कर्णधारपद नको होतं तेव्हा तो कर्णधार झाला याचं मला आश्चर्य वाटलं नाही," असं सांगितलं.
"त्याला कर्णधार बनवण्यासाठी बराच वेळ लागला कारण तो कर्णधार होण्यासाठी तयार नव्हता. त्याला आण्ही सर्वांनी पाठिंबा देत कर्णधार केला. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जी काही प्रगती केली आहे ती पाहून मी फार समाधानी आहे," असं गांगुली म्हणाला.
नक्की वाचा >> भारत सेटींग लावून T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये, इंझमामचा गंभीर आरोप; म्हणाला, 'पाकिस्तानला कधीच..'
"मला नाही वाटतं की तो सात महिन्याच्या कालावधीत सलग दोन वर्ल्ड कप स्पर्धांचे अंतम सामने गमावेल. सात महिन्यांच्या कालावधीत त्याच्या नेतृत्वाखालील संघ दोन वेळा दोन वेगवेगळ्या वर्ल्ड कप स्पर्धांच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला तर तो बार्बाडोसच्या समुद्रात उडी मारेल. त्याने स्वत: आदर्श निर्माण करत नेतृत्व केलं आहे. त्याने उत्तम फलंदाजी केली आहे. उद्याही तो अशीच कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. भारतीय संघ विजयी ठरेल अशी अपेक्षा आहे. त्यांनी मुक्तपणे खेळलं पाहिजे," असंही गांगुलीने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> टीम इंडियाचे चाहते असाल तर हे वाचू नका... उद्या ODI वर्ल्ड कपची पुनरावृत्ती? फायनलचं मैदान भारतासाठी पनवती
"ते या स्पर्धेतील सर्वोत्तम संघ म्हणून खेळले आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ते जिंकतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. उद्या भारतीय संघाला नशीबाची साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी हे सुद्धा गरजेचं असतं," असं गांगुली म्हणाला.