T20 World Cup: सूर्यकुमारच्या मते 'हा' जगातील सर्वोत्तम गोलंदाज; विशेष म्हणजे तो बुमराह नव्हे तर...

T20 World Cup: भारताचा 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर बोलताना, जागतिक क्रमवारीतील सर्वोत्तम गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची गरज अधोरेखित केली.  

शिवराज यादव | Updated: Jun 22, 2024, 05:01 PM IST
T20 World Cup: सूर्यकुमारच्या मते 'हा' जगातील सर्वोत्तम गोलंदाज; विशेष म्हणजे तो बुमराह नव्हे तर... title=

T20 World Cup: अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत 53 धावा करत विजयी खेळी केली. भारताचे दिग्गज फलंदाज अयशस्वी ठरत असताना सूर्यकुमार यादवने मात्र मैदानावर भक्कम खेळी करत संघाचा डाव सावरला आणि अफगाणिस्तानसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. सूर्यकुमार यादवने राशीदच्या गोलंदाजीवर 6 चेंडूत 16 धावा ठोकल्या. सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार यादवने अफगाणिस्तानचा गोलंदाज राशीदचं कौतुक करताना जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचं म्हटलं. तसंच त्याने जागतिक क्रमवारीतील सर्वोत्तम गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची गरज अधोरेखित केली.

"मी हे याआधीही सांगितले आहे आणि मी पुन्हा सांगेन की जेव्हा तो गोलंदाजी करतो, तेव्हा त्याच्याविरोधात खेळणं फार अवघड असतं. पण जेव्हा मी मैदानात असतो तेव्हा मला कोणते शॉट्स खेळायचे आहेत हे माहिती असतं. तो जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. तुम्ही त्यांना वरचढ होण्याची संधी देऊ नका. तुम्हाला एक पाऊल पुढे ठेवावे लागेल. आज मी चांगल्या बाजूने आहे याचा आनंद आहे," असं सूर्यकुमार म्हणाला आहे. 

प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतल्याने भारताची धावसंख्या 10 षटकांनंतर 79 धावांवर 3 गडी बाद अशी होती. पण सूर्यकुमारने हार्दिक पांड्यासोबत केलेल्या भागीदारीमुळे संघाने सामन्यात पुनरागमन केलं. यानंतर भारताने 181/8 अशी भक्कम धावसंख्या उभी केली. 

यानंतर भारताने अफगाणिस्तान संघाला 134 धावांवर सर्वबाद केलं. जसप्रीत बुमराहने यावेळी जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने 7 धावा देत 3 विकेट्स मिळवले. भारताने हा सामना 47 धावांनी जिंकला. 

सामन्यानंतर सूर्यकुमारला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आपल्या कामगिरीबद्दल बोलताना तो म्हणाला, "मला वाटतं की यामागे खूप मेहनत आणि सराव आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की यामागे बरंच काही आहे. प्रक्रिया आणि दिनचर्या गुंतलेली आहेत. जेव्हा मी खेळत असतो तेव्हा मला काय करायचं आहे माहित असतं".

"मला अजूनही आठवतंय, जेव्हा हार्दिक बॅटिंगसाठी आला तेव्हा मी त्याला तेच सांगितलं होतं. चेंडू जसजसा जुना होईल तसं आव्हान वाढत जाईल याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे मी त्याला आपण खेळत राहू आणि 16 व्या ओव्हरपर्यंत काय होईल हे पाहूयात असं सांगितलं. आम्ही 180 धावा करु शकलो याचा आनंद आहे," असं सूर्यकुमारने सांगितलं. 

अमेरिकेतील मैदानांवरील आव्हानं आणि त्यानंतर आता वेस्ट इंडिजमधील सामने याबद्दल विचारण्यात आलं असता सूर्यकुमार म्हणाला की, "मला वाटते की तुम्हाला फक्त गेम प्लॅन काय आहे हे माहित असणे आवश्यक आहे. तुम्हाला काही सराव सत्रे मिळाल्यावर तुम्ही त्यानुसार सराव करता आणि फक्त तुमचा खेळ जाणून घ्या आणि जेव्हा तुम्ही आत जाता तेव्हा संघाला त्या दिवशी आवश्यक असलेल्या गोष्टी करा. तुम्ही फक्त परिस्थितीनुसार खेळा".