मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये भारत संघ हा सगळ्यात दमदार का आहे? याचं उत्तर इंग्लंड विरूद्ध असलेल्या प्रॅक्टिस सामन्यात अधिक स्पष्ट झालं. दुबईत झालेल्या प्रॅक्टिस मॅचमध्ये टीम इंडियाने इंग्लंडला हरवलं. इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 188 धावा केल्या. असं असलं तरीही टीम इंडियाने विजय पटकावला आहे.
केएल राहुल आणि इशान किशनच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. केएल राहुलने फक्त 24 चेंडूत 51 धावा केल्या तर इशान किशनने 70 धावा केल्या. इशान किशन 46 चेंडू खेळून नाबाद निवृत्त झाला आणि त्याने त्याच्या डावात 7 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेटही 150 पेक्षा जास्त होता. पंतनेही नाबाद 29 धावा केल्या.
इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने 49 धावा केल्या. मोईन अलीनेही 20 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने 20 चेंडूत 30 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी निराशा केली. भुवनेश्वर कुमारने 4 षटकांत 54 धावा दिल्या. शमीने नक्कीच 3 विकेट्स घेतल्या होत्या पण त्यानेही 40 धावा गमावल्या. राहुल चहरनेही एका विकेटसाठी 43 धावा दिल्या.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉय आणि जोस बटलरने इंग्लंडला झटपट सुरुवात केली पण दोघेही शमीच्या उत्कृष्ट चेंडूंना बळी पडले. डेव्हिड मलाननेही 18 धावा केल्या आणि राहुल चहरच्या गुगलीने त्याला पॅव्हेलियनमध्ये परतण्यास भाग पाडले.
10 व्या षटकापर्यंत भारतीय गोलंदाजी चांगली होती पण त्यानंतर बेअरस्टो आणि लिव्हिंगस्टोनने भारतीय गोलंदाजांना मागच्या पायांवर ढकलले. बेअरस्टोने 36 चेंडूत 49 धावा आणि लिव्हिंगस्टोनने 20 चेंडूत 30 धावा केल्या. मोईन अलीच्या झटपट फटकेबाजीने भारतीय गोलंदाजांची आकडेवारीच खराब केली. मोईन अलीने केवळ 20 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या.