T20 WC : सुपर-8 मध्ये टीम इंडियाचे कोणत्या संघाशी आणि कधी होणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये आपली जागा पक्की केली आहे. आता रोहित शर्माची टीम इंडिया 15 जूनला ग्रुपमधला आपा शेवटचा सामना खेळेल. त्यानंतर सुपर-8 साठी वेस्टइंडिजला रवाना होईल.

राजीव कासले | Updated: Jun 14, 2024, 05:59 PM IST
T20 WC : सुपर-8 मध्ये टीम इंडियाचे कोणत्या संघाशी आणि कधी होणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक title=

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आता ग्रुप स्टेजचे सामने संपत आले असून 19 जूनपासून सुपर-8 (Super-8) ची चुरस सुरु होईल. यंदाच्या टी20 वर्ल्ड वर्ल्ड कपमध्ये  (T20 World Cup ) 20 संघांनी भाग घेतला होता. यापैकी सहा संघ ग्रुप स्टेजमधून बाहेर पडले आहेत. तर भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज आणि अफगाणिस्तानने सुपर-8 मध्ये एन्ट्री केलीय. आता संघांपैकी तीन संघ कोणते हे ठरणार आहे. याचा निर्णय झाल्यानंतर सुपर-8 मध्ये प्रत्येकी चार संघांचे दोन ग्रुप असणार आहेत. दोन्ही ग्रुपमधील टॉपचे दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. एका ग्रुपमध्ये प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे आहेत. यापैकी भारतीय संघाचं वेळापत्रक समोर आलं आहे. 

टीम इंडियाचं वेळापत्रक
टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 मध्ये भारत ग्रुप-1 मध्ये आहे. या ग्रुपमधल्या सर्व संघांचा निर्णय अद्याप बाकी आहे. पण भारती क्रिकेट संघ (Team India) कोणत्या तारखेला कोणत्या ठिकाणी तीन सामने खेळणार हे निश्चित झालं आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 20 जूनला वेस्ट इंडिजच्या बारबाडोसमध्ये खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा दुसरा सामना 22 जूनला एंटिगामध्ये होईल. तर तिसरा आणि शेवटचा सामना 24 जूनला सेंट लूसियामध्ये खेळला जाईल. 

कोणत्या संघाशी रंगणार सामने?
सुपर-एटमध्ये ग्रुप-1 मध्ये भारताशिवाय आणखी दोन संघांनी प्रवेश केला आहे. तर चौथ्या संघाचा अद्याप फैसला व्हायचा आहे. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानने प्रवेश केलाय. आता ग्रुप डी मधून चौथ्या संघाचा निर्णय होणार आहे. ग्रुप डी मधून श्रीलंकेचा पत्ता कट झाला आहे. या ग्रुपमधून दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 मध्ये धडक मारलीय. त्यामुळे आता बांगलादेश किंवा नेदरलँड संघांपैकी एक संघ सुपर-8 मध्ये पोहोचेल. यात बांगलादेशची शक्यता जास्त आहे. 

ग्रुप डीमध्ये बांगलादेशने तीन पैकी 2 सामने जिंकले आहेत. बांगलादेशचा पुढचा सामना नेपाळ संघाशी आहे. त्यामुळे भारताचा सुपर-8 मध्ये तिसरा सामना बांगलादेशविरुद्ध होण्याची शक्यता आहे. बांगलादेशने सुपर-8 मध्ये प्रवेश केल्यास 22 जूनला एंटिगांमध्ये भारत-बांगलादेश आमने सामने असतील. तर 20 जूनला भारत आणि अफगाणिस्तान सामना होईल. आणि 24 जूनला सेंट लूसियामध्ये ऑस्ट्रेलियाशी टीम इंडिया दोन हात करेल.

टीम इंडियाचा ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना 15 जूनला कॅनडाविरुद्ध खेळला जाणार आहे.