IND vs PAK : बाप बाप असतो...! रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

India beat Pakistan in T20 world Cup 2024 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सर्वात रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला. जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत विजयाचे हिरो ठरले.

सौरभ तळेकर | Updated: Jun 10, 2024, 01:17 AM IST
IND vs PAK : बाप बाप असतो...! रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय title=
India beat Pakistan in T20 world Cup 2024

India vs Pakistan : न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा (T20 world Cup) 19 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला 6 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाकडून गोलंदाजी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि फलंदाजीत ऋषभ पंत (Rishabh Pant) हिरो ठरले. ऋषभ पंतने 42 धावांची झुंजार खेळी केली तर जसप्रीत बुमराहने मोक्याच्या क्षणी 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे आता टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या इतिहासात सातव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. पराभव समोर दिसत असताना भारतीय गोलंदाजांनी दमदार कमबॅक केलं अन् पाकिस्तानच्या फलंदाजांना गुघड्यावर आणलं. 

टीम इंडियाने दिलेलं 120 धावांचं आव्हान पाकिस्तानसाठी किरकोळ होतं. पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी चांगली सुरूवात करून दिली. भारताला झटपट विकेट्सची आवश्यकता होती. बुमराहने पहिली विकेट काढून दिली अन् भारतीय खेळाडूंनी सुटकेचा श्वास घेतला. त्यानंतर रिझवानने एक बाजून सांभाळून ठेवली होती. 15 व्या ओव्हरमध्ये बुमराहने पुन्हा रिझवानची विकेट घेतली अन् टीम इंडियाने सामन्यात कमबॅक केलं. अखेरच्या 4 ओव्हरमध्ये पाकिस्तान 35 धावांची गरज होती. मात्र, बुमराहच्या अखेरच्या दोन ओव्हरने सामन्याचं पारडं फिरलं. टीम इंडियाने अखेर पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला.

पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर टीम इंडिया 119 धावांवर गारद झाली. सलामीवीर विराट कोहली केवळ भोपळा फोडून बाद झाला. रोहित शर्माने आपल्या अंदाजात फलंदाजी केली अन् बाद झाला. मात्र मैदानात टिकून राहिला तो ऋषभ पंत... स्लो पीचमुळे भारतीय फलंदाज पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर टिकू शकले नाहीत. 89 वर तीन गडी बाद अशी परिस्थिती असताना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पीचची मदत घेतली अन् फलंदाजांना स्लो बॉलच्या जाळ्यात अडकवलं. भारताकडून ऋषभ पंतने 42 धावांची खेळी केली. तर नसीम शाह आणि हॅरिस रौफने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद आमिरने 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (WK), बाबर आझम (C), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर.

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (C), विराट कोहली, ऋषभ पंत (WK), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.