२०१८मध्ये टेस्ट क्रमवारीत भारतीय टीम अव्वल, पण न्यूझीलंड बेस्ट!

२०१८ वर्षाच्या शेवटीही टेस्ट क्रिकेटच्या क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर कायम राहिला.

Updated: Dec 31, 2018, 03:44 PM IST
२०१८मध्ये टेस्ट क्रमवारीत भारतीय टीम अव्वल, पण न्यूझीलंड बेस्ट! title=

दुबई : २०१८ वर्षाच्या शेवटीही टेस्ट क्रिकेटच्या क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर कायम राहिला. तर न्यूझीलंडनं लागोपाठ चौथी सीरिज जिंकत दक्षिण आफ्रिकेला मागे टाकलं. भारतानं तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा १३७ रननी पराभव करत ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये २-१नं आघाडी घेतली आहे. सध्या आयसीसीच्या क्रमवारीमध्ये भारत ११६ अंकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंड १०८ अंकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावर्षाच्या सुरुवातीला भारतीय टीमच्या खात्यात १२४ अंक होते. पण परदेश दौऱ्यांमध्ये झालेल्या भारताच्या पराभवाचं नुकसान अंकांमध्ये झालं आहे.

२०१८ या वर्षात भारतानं २ टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवला आणि २ टेस्ट सीरिज गमावल्या. २०१८ या वर्षाची सुरुवात भारतानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यानं केली. या सीरिजमध्ये भारताचा १-२नं पराभव झाला. या पराभवामुळे भारताचे ३ अंक कमी होऊन १२१ झाले.

इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतरही अवल्ल

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतानं अफगाणिस्तानविरुद्धची एकमेव टेस्ट जिंकली आणि भारताच्या खात्यात १२५ अंक झाले. यानंतर भारत इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. इंग्लंडविरुद्ध भारताला १-४ नं पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताचे ११५ अंक झाले असले तरी ते क्रमवारीत अव्वल राहिले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या २ टेस्ट मॅचची सीरिज भारतानं २-०नं जिंकली. या विजयामुळे भारताला एक अंकाचा फायदा झाला आणि खात्यात ११६ अंक जमा झाले.

न्यूझीलंडची सर्वोत्तम कामगिरी

२०१८ या वर्षामध्ये न्यूझीलंडनं सर्वोत्तम कामगिरी केली आहे. क्राईस्टचर्चमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा तब्बल ४२३ रननं विजय झाला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडच्या खात्यात १०७ अंक झाले आहेत. भारत आणि इंग्लंडनंतर न्यूझीलंडची टीम तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिका (१०६ अंक) चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडनं पुढच्या २ टेस्ट जिंकल्या तर त्यांच्या खात्यात १०९ अंक होतील आणि ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतील.

दक्षिण आफ्रिकेच्या टीमलाही दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे. यासाठी आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्ध ३-०नं विजय मिळवावा लागेल. दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला तर त्यांच्या खात्यात १०९ अंक होतील. या सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिका १-०नं आघाडीवर आहे.