मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला आहे. या विजयाबरोबरच भारतानं ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये २-१नं आघाडी घेतली आहे. २०१८ या वर्षातली भारताची ही शेवटची मॅच होती. यावर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये भारतानं आणि भारतीय खेळाडूंनी अनेक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केली. भारतानं यावर्षी सर्वाधिक मॅच खेळल्या, परदेशात सर्वाधिक विजय मिळवले. सर्वाधिक रन भारतीय खेळाडूनंच केले. तर भारतीय बॉलरनी ३४ वर्ष जुनं रेकॉर्ड मोडीत काढलं. वर्षाचा शेवट भारतानं आयसीसी टेस्ट क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहत केला.
२०१८ या वर्षात २१ टेस्ट सीरिज खेळवण्यात आल्या. यातल्या १९ सीरिजचे निकाल आले आहेत तर २ टेस्ट सीरिज सुरु आहेत. या वर्षात न्यूझीलंडनं सर्वाधिक ३ सीरिज जिंकल्या. तर भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंकेनं प्रत्येकी २-२ सीरिज आपल्या नावावर केल्या. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी एक-एक टेस्ट सीरिज जिंकली. यावर्षी अफगाणिस्तान आणि आयर्लंडनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
भारतानं यावर्षी सर्वाधिक १४ टेस्ट मॅच खेळल्या. यातल्या ७ टेस्टमध्ये विजय आणि ७ मध्ये पराभव पत्करावा लागला. भारतानं परदेशात ४ टेस्ट आणि भारतात ३ टेस्टमध्ये विजय मिळवला. यावर्षी परदेशात भारतानं दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला एक मॅचमध्ये आणि ऑस्ट्रेलियाला २ मॅचमध्ये अशा एकूण ४ मॅचमध्ये पराभूत केलं. तर भारतानं मायदेशात अफगाणिस्तानला १ आणि वेस्ट इंडिजला २ टेस्टमध्ये हरवलं. यावर्षी इंग्लंडनं सर्वाधिक ८ टेस्ट मॅच जिंकल्या. पण यातले ५ विजय घरच्या मैदानात आणि उरलेले ३ विजय श्रीलंकेमध्ये आले होते.
यावर्षी विराट कोहलीनं टेस्टमध्ये सर्वाधिक रन केले. विराटनं यावर्षी १३ टेस्टमध्ये ५५.०८ च्या सरासरीनं १,३२२ रन केले. विराटशिवाय फक्त श्रीलंकेच्या कुसल मेंडीसला एक हजार रनचा टप्पा ओलांडता आला. मेंडिसनं यावर्षी १,०२३ रन केल्या. यावर्षी टेस्टमध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडूही विराटच आहे. विराटनं टेस्ट क्रिकेटमध्ये ५ शतकं केली आहे. बांगलादेशचा मोमीनुल हक ४ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीनं यावर्षी १३६ विकेट घेतल्या. याचबरोबर भारताच्या या त्रिकुटानं वेस्ट इंडिजच्या मायकल होल्डिंग, जोएल गार्नर आणि मालकम मार्शलनं १९८४ मध्ये घेतलेल्या १३० विकेटचं रेकॉर्ड मोडलं. यावर्षी टॉप-१० बॉलरमध्ये भारताचे बुमराह, इशांत आणि शमी आहे. बुमराहनं पदार्पणच्या वर्षातच टेस्ट क्रिकेटमध्ये ४८ विकेट घेतल्या. यावर्षी टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या कागीसो रबाडानं केला आहे. रबाडानं यावर्षी ५२ विकेट घेतल्या.
भारतानं यावर्षी ३ फॉरमॅटपैकी २ फॉरमॅटपमध्ये सगळ्यात मोठा विजय नावावर केला. राजकोट टेस्टमध्ये भारतानं वेस्ट इंडिजला इनिंग आणि २७२ रननी हरवलं. हा वर्षातला इनिंग आणि रनच्या आधारावरचा सगळ्यात मोठा विजय होता. हैदराबाद टेस्टमध्ये भारतानं वेस्ट इंडिजला १० विकेटनी पराभूत केलं. विकेटच्या आधारावर हा वर्षातला मोठा विजय होता. रनच्या दृष्टीकोनातून सगळ्यात मोठा विजय दक्षिण आफ्रिकेला मिळाला. आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला जोहान्सबर्गमध्ये ४९२ रननी पराभूत केलं.
१ ऍडलेड टेस्टमध्ये ऋषभ पंतनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका इनिंगमध्ये ६ कॅच पकडले. या वर्षात कोणत्याच विकेट कीपरला एवढे कॅच पकडता आले नाहीत.
२ पृथ्वी शॉ २०१८ मध्ये सर्वाधिक सरासरीनं रन करणारा बॅट्समन ठरला. शॉनं २ टेस्टमध्ये ११८.५० च्या सरासरीनं २३७ रन केले.
३ सर्वाधिक ५० पेक्षा जास्त स्कोअर विराट कोहलीनं केले. १० वेळा विराटनं हा आकडा पार केला. यामध्ये ५ शतकांचा समावेश आहे.
४ विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि इंग्लंडच्या जो रुटनं यावर्षी सर्वाधिक प्रत्येकी १३-१३ मॅच खेळले. कोहलीनं यावर्षी १,३२२ रन, पुजारानं ८३७ रन आणि रुटनं ९४८ रन केले.
५ दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजनं श्रीलंकेविरुद्ध एका इनिंगमध्ये ९ विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकन खेळाडूची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
६ न्यूझीलंडच्या टॉम लेथमनं यावर्षी सगळ्यात मोठी धावसंख्या उभारली. श्रीलंकेविरुद्ध लेथमनं नाबाद २६४ रन केले.
७ वेस्ट इंडिजच्या शिमरोन हेटमायरनं यावर्षी सर्वाधिक १७ सिक्स मारले. १६ सिक्स मारणारा ऋषभ पंत दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
८ इंग्लंडच्या इयन गोल्ड यांनी यावर्षी सर्वाधिक ९ टेस्ट मॅचमध्ये अंपायरिंग केली. कुमार धर्मसेना, एलिंगवर्थ, ब्रुस ऑक्सेंफर्ड, रॉड टकर प्रत्येकी ८-८ मॅचमध्ये अंपायर होते.
९ श्रीलंकेनं बांगलादेशविरुद्ध यावर्षीचा सर्वाधिक स्कोअर केला. श्रीलंकेनं ७१३/९ एवढी धावसंख्या उभारली. दुसरा मोठा स्कोअर भारताच्या नावावर राहिला. भारतानं वेस्ट इंडिजविरुद्ध ६४९/९ एवढा स्कोअर केला.
१० वर्षातली सगळ्यात कमी धावसंख्या बांगलादेशच्या नावावर होती. वेस्ट इंडिजनं बांगलादशचा ४३ रनवर ऑल आऊट केला.