Benefit For CSK And Dhoni Ahead of 2025 IPL: इंडियन प्रिमिअर लीगच्या पुढील पर्वाची तयारी हळूहळू सुरु झाली आहे. साधारण महिन्याभरापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अधिकारी 10 आयपीएल संघांच्या मालकांना भेटले होते. या संघ मालकांच्या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. तसेच 2025 च्या पर्वाआधी मेगा ऑक्शन म्हणजेच महालिलाव होण्याची दाट शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी या स्पर्धेच्या भविष्यातील बदलांसंदर्भात संघ मालकांबरोबर सविस्तर चर्चा केली आहे. काही बातम्यांनुसार या चर्चेदरम्यान बीसीसीआयने अन-कॅप प्लेअरचा नियम पुन्हा लागू करण्यासंदर्भात संघ मालकांबरोबर चर्चा केली आहे. आता हा नेमका नियम काय आहे आणि तो पुन्हा लागू केल्यास त्याचा काय परिणाम होणार ते पाहूयात...
अन-कॅप प्लेअर नियमानुसार एखादा खेळाडू पाच वर्षांहून अधिक काळापूर्वी निवृत्त झाला असेल तर त्याला नवखा खेळाडू म्हणजेच अन-कॅप खेळाडू म्हणून गृहित धरलं जाईल. म्हणजे उदाहरणासहीत सांगायचं झालं तर राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर यासारख्या खेळाडूंनी पुन्हा आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना अन-कॅप खेळाडू म्हणून ग्राह्य धरलं जाईल.
सर्वाधिक फायदा सीएसके आणि धोनीला
हा नियम 2025 च्या पर्वासाठी होणाऱ्या लिलावापासून पुन्हा लागू केला जाणार आहे. 'न्यूज 18'ने दिलेल्या वृत्तानुसार, हा नियम लागू झाला तर सर्वाधिक फायदा चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला होणार आहे. सीएसके अगदी मोकळ्या मनाने या नियमाचं स्वागत करेल कारण यामुळे महेंद्र सिंह धोनीचा आयपीएलमधील मुक्काम नक्कीच अधिक काळ वाढेल. आता या नियमाबद्दल बीसीसीआयकडून अधिकृत घोषणा बाकी असली तरी हा नियम नक्की कसा काम करणार आणि याचा सीएसके तसेच धोनीला कसा फायदा होणार हे पाहूयात...
अन-कॅप प्लेअर नियम 2008 ते 2021 च्या आयपीएलदरम्यान अस्तित्वात होता. मात्र त्याचा कधीच वापर करण्यात आला नाही. त्यामुळे तो 2021 मध्ये नियमांच्या यादीतून वगळण्यात आला. आता 2025 मध्ये धोनी अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाच वर्ष पूर्ण होतील. याच पार्श्वभूमीवर चाहत्यांमध्ये या नियमाची चर्चा आहे. मात्र सीएसकेने संघ मालकांच्या बैठकीमध्ये हा मुद्दा संघ व्यवस्थापनाने उपस्थित केला नाही असं स्पष्ट केलं आहे.
2022 मध्ये संघांना त्यांच्या संघात असलेले असे पाच वर्षांहून अधिक काळापासून निवृत्त झालेले अन-कॅप खेळाडू रिटेन करण्याची संधी देण्यात आलेली. विशेष म्हणजे हे खेळाडू केवळ 4 कोटींना रिटेन करता येणार होते. त्यामुळेच हा नियम लागू झाल्यास सीएसके चार कोटींमध्ये धोनीला संघात कायम ठेऊन बरेच पैसे वाचवू शकेल. ज्यामधून त्यांना अधिक चांगले खेळाडू विकत घेता येतील. कर्णधार म्हणून धोनीसाठीही हे फायद्याचं ठरणार आहे. तसेच कमी पैशांमध्ये धोनी संघात कायम राहणार असल्याने अधिक वर्षांसाठी त्याचा विचार संघाकडून केला जाईल.
धोनी 15 ऑगस्ट 2020 रोजी अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्याने पुढील वर्षी त्याच्या निवृत्तीला पाच वर्ष पूर्ण होतील. त्यामुळेच आता बीसीसीआय नव्याने नियम आणताना पाच वर्षांऐवजी चार वर्षांचा नियम करते का यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत.