फ्रॅक्चरमुळे जसप्रीत बुमराह आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर

बुमराहला भारतामध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये आराम दिला पाहिजे.

Updated: Sep 24, 2019, 06:21 PM IST
फ्रॅक्चरमुळे जसप्रीत बुमराह आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर title=

मुंबई: भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याला पाठीच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्याऐवजी उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. 

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, दैनंदिन तपासणीच्यावेळी बुमराहच्या पाठीच्या खालच्या भागात लहानसे फ्रॅक्चर आढळून आले. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. कर्नाटक येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्यावर उपचार होणार आहेत.

त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला बुमराह मुकणार आहे. २ ऑक्टोबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामान्याला सुरुवात होईल. 

२५ वर्षांच्या बुमराहने आतापर्यंत १२ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि ४२ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. १२ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ६२ बळी मिळवले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व कसोटी सामने बुमराहने परदेशात खेळले होते. 

बुमराहच्या जागी संघात स्थान देण्यात आलेल्या उमेश यादवने आतापर्यंत ४१ कसोटी सामाने खेळले आहेत. यामध्ये त्याने ११९ बळी टिपले आहेत. 

दरम्यान, बुमराहच्या दुखापतीविषयी बोलताना भारताचे माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांनी म्हटले की, बुमराहला भारतामध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये आराम दिला पाहिजे. आपल्याला त्याची गुणवत्ता वाया घालवून चालणार नाही. आजच्या घडीला तो जगातील सर्वोत्तम जलदगती गोलंदाज आहे. त्यामुळे तुर्तास भारतामधील कठीण परिस्थिती त्याला खेळवणे योग्य ठरणार नाही, असे चेतन शर्मा यांनी सांगितले.