Virat Kohli Flop In Batting: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मात आहे. नोव्हेंबर 2019 नंतर त्याने एकही शतक झळकावलं नाही. रन मशिन्स म्हणून ओळखला जाणारा विराट कोहलीची बॅट अडखळल्याचं दिसतंय. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाचव्या कसोटीत त्याने 11 आणि 20 धावा केल्या. या सामन्यात भारताचा सात विकेट्सने पराभव झाला. त्यामुळे विराट कोहलीच्या चाहत्यांना त्याच्या करिअरची चिंता सतावत आहे. विराटच्या बॅटला नेमकी कुणाची नजर लागली? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. मात्र भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी फ्लॉप होण्यामागचं कारण सांगितलं आहे. स्विंगला सामोरे जाण्यासाठी विराट कोहलीची चेंडू लवकर खेळण्याची रणनीती अपयशी ठरल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे इंग्लंडच्या खेळपट्टीवर चेंडू शक्य तितक्या उशिरा खेळण्याचा त्यांनी सल्ला दिला आहे.
'स्पोर्ट्स टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत गावस्कर म्हणाले, 'इंग्लंडमध्ये खेळण्याचा मार्ग म्हणजे चेंडू शक्य तितक्या उशिराने खेळणे. याच्या मदतीने तुम्ही चेंडूला त्याचे काम करू द्यावं आणि त्यानंतरच खेळा. 'हायलाइट'मध्ये मी जे काही पाहिले आहे, त्यात कोहली चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करत होता आणि चेंडू पटकन खेळण्याचा त्याचा अट्टाहास होता. तो 2018 सारखा खेळताना दिसत नाही, तेव्हा तो ऑफ-स्टंपजवळ खूप उशीरा खेळताना दिसला होता.'
'जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये नसता, तेव्हा तुम्ही जवळपास प्रत्येक चेंडू खेळण्याचा प्रयत्न करता आणि धावा काढण्याचा प्रयत्न करत असलेल्या प्रत्येक चेंडू तुम्हाला मारायचा असतो. मात्र, कोहलीचे नशीबही साथ देत नाही.', असंही गावस्कर यांनी सांगितलं.