दुबई : आयसीसीच्या ताज्या टेस्ट क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली बॅट्समनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत यांनाही त्यांच्या चांगल्या कामगिरीचा फायदा झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये शॉनं शानदार शतक केलं. तर हैदराबादमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये त्यानं ७० रन आणि नाबाद ३३ रनची खेळी केली. या दोन इनिंगमुळे शॉ १३ स्थान वरती ६०व्या क्रमांकावर आला आहे. पदार्पणातल्या मॅचमध्येच शतक केल्यामुळे तो टेस्ट क्रमवारीत ७३ व्या क्रमांकावर होता.
विकेट कीपर बॅट्समन ऋषभ पंतनं दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ९२ रनची खेळी केली. यामुळे त्यानं २३ स्थानांची उडी मारली. आता ऋषभ पंत ६२ व्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंत सीरिजच्या आधी १११व्या क्रमांकावर होता. राजकोटमध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्येही त्यानं ९२ रनच केले होते.
चेतेश्वर पुजारा आयसीसीच्या या क्रमवारीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. अजिंक्य रहाणेनं दुसऱ्या टेस्टमध्ये ८० रनची खेळी केली. या खेळीमुळे रहाणे १८व्या क्रमांकावर पोहोचला आहे. टॉप २० मध्ये कोहली, पुजारा आणि रहाणे हे तीन भारतीय आहेत. या टेस्टमध्ये १० विकेट घेतल्यामुळे उमेश यादवला ४ स्थानांचा फायदा झाला आहे. बॉलरच्या यादीत उमेश यादव २५ व्या क्रमांकावर आहे.
बॉलरच्या यादीमध्ये इंग्लंडचा जेम्स अंडरसन पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर भारताचा रवींद्र जडेजा चौथ्या क्रमांकावर आणि आर. अश्विन आठव्या क्रमांकावर आहे. टॉप २०मध्ये हे दोनच भारतीय बॉलर आहेत.
ऑल राऊंडरच्या यादीत रवींद्र जडेजा दुसऱ्या क्रमांकावर आणि आर. अश्विन पाचव्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा शाकीब अल हसन पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
टीमच्या क्रमवारीमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. यानंतर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.