India vs Pakistan T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 मधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियानं 6 धावांनी रोमांचक विजय मिळवला. अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात टीम इंडियाने (IND vs PAK) बाजी मारली अन् पाकिस्तानला पुन्हा एकदा गुघड्यावर टेकवलंय. पाकिस्तानच्या खराब कामगिरीवर सध्या जोरदार टीका होताना दिसतेय. अशातच पाकिस्तानचा माजी कॅप्टन वसीम अक्रम (Wasim Akram) देखील चांगलाच भडकल्याचं पहायला मिळतंय. वसीम अक्रमने पाकिस्तानच्या दोन खेळाडूंना पराभवाला कारणीभूत ठरवलं. वसीम अक्रम का भडकला? जाणून घ्या..
पाकिस्तानच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटूंनी संघाच्या कामगिरीवर टीका केली आहे. अनेकांनी बाबर आझमसह इतर खेळाडूंना धारेवर धरलंय. तर वसीम अक्रमने मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांच्या खराब फलंदाजीवर जोरदार टीका केली. इथे महत्त्वाचा सामना सुरू आहे आणि इफ्तिखार अहमदला फलंदाजी कशी करावी हे माहित नाही? इफ्तिखार अहमदला लेग साइडवर एकच शॉट कसा खेळायचा हे माहीत आहे का? असा सवाल वसीम अक्रमने विचारला आहे. गेल्या 10 वर्षापासून तो पाकिस्तान संघाकडून खेळतोय. मात्र, त्याला शॉर्टस कसे खेळायचे? याची माहिती नाहीये का? असं म्हणत वसीम अक्रमने खणखणीत टीका केली.
वसीमने यावेळी रिझवानला देखील धारेवर धरलं. बुमराहला जेव्हा ओव्हर दिली गेली, तेव्हा तो विकेट्स घेण्यासाठी आला होता. तेव्हा त्याला काळजीपूर्वक खेळायला हवं होतं, असंही वसीम अक्रमने म्हटलं आहे. बुमराहला काळजीपूर्वक खेळणं यातच शहाणपणा होता, हे रिझवान कळलं का नाही? तो त्याचवेळी आक्रमक का खेळायला गेला? असा खोचक सवाल वसीमने विचारलाय.
दरम्यान, पाकिस्तानच्या संघात असे खेळाडू आहेत ज्यांना एकमेकांशी बोलायचं नाही. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहात आणि तुम्ही स्वतःसाठी खेळताय. याला काही अर्थ नाहीये, अशा खेळाडूंना घरी बसवा, अशी टीका देखील वसीम अक्रमने यावेळी केली आहे.