Sanjay Raut On World Cup Final: वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने यजमान भारताला 6 विकेट्सने पराभूत केलं. सलग 10 सामने जिंकणाऱ्या भारताला नमवून वर्ल्ड कपमधील 9 वा विजय मिळवत थेट वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरलं. या पराभवाचा सर्वांनाच मोठा धक्का बसला असून भारतीय संघ विजयी होईल अशी अपेक्षा सर्वांनाच होती. हा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित असलेल्या सव्वा लाख भारतीय प्रेक्षकांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच अनेक आजी-माजी क्रिकेटपटूही हजर होते. मात्र या सामन्यात भारताचा पराभव झाल्याने सर्वांचीच निराशा झाली आहे. अशातच आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वर्ल्ड कप फायलन नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवल्याने पराभूत झाल्याची चर्चा असल्याचा मुद्दा उपस्थित करत मुंबईतील वानखेडेवर हा सामना खेळवला असता तर भारत जिंकला असता असंही म्हटलं आहे.
वर्ल्ड कप फायलनबद्दल दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. "आपण पराभूत झाल्याचं सर्वांनाच दु:ख झालं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपला संघं फारच उत्तम आहे. त्यांनी वर्ल्ड कपमधील पहिले 10 सामने जिंकले. मात्र फायनलमध्ये आपण नरेंद्र मोदी स्टेडियमवर पराभूत झालो. लोक म्हणतात की वानखेडेवर सामना खेळवला असता तर आपण जिंकलो असतो. मला नेमकं ठाऊक नाही हे कारण मी क्रिकेट चाहता नाही. मात्र जसं इंग्लंडमध्ये लॉर्ड्स हे क्रिकेटचं सर्वात महत्त्वाचं मैदान समजलं जातं. तसं वानखेडे आहे. मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. क्रिकेटचे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी वानखेडे आणि मुंबई फार महत्त्वाची जागा आहे. दिल्लीमधील फिरोज शाह कोटलामध्येही सामने खेळवले जातात," असं संजय राऊत यांनी म्हटलं.
या मैदानातच वर्ल्ड कप खेळून जिंकायचा आणि श्रेय मोदींना द्यायचं असा भाजपाचा प्लॅन होता असा दावाही राऊत यांनी केला. "सरदार वल्लभाई पटेल यांचं नाव बदलून ते नरेंद्र मोदी स्टेडियम केलं. तिथे वर्ल्ड कप खेळवण्यासाठी आणि जिंकण्यासाठी हे नाव बदलण्यात आलं वर्ल्ड कप जिंकला तर नरेंद्र मोदी स्टेडियमवर जिंकला. मोदीजी तिथे होते म्हणून जिंकला, असा भारतीय जनता पार्टीचा मोठा प्लॅन सुरु होता. मात्र या देशाचं दुर्देव आहे की भारतीय संघ चांगला खेळूनही पराभूत झाला," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
VIDEO | "Our team under the leadership of Rohit Sharma played really well and won 10 games. However, we lost the final at the Narendra Modi Stadium. Some people say that we would have won if the match had happened at Wankhede Stadium. I can't comment about it, though," says Shiv… pic.twitter.com/MtFEXAFvJU
— Press Trust of India (@PTI_News) November 20, 2023
याच मैदानामध्ये भारताने 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध झालेला वर्ल्ड कप 2023 मधील सामना जिंकला होता.