कोहली म्हणतो माहीला टी-२० खेळायचं नाही, मग तरी धोनीचं पुनरागमन का?

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धची वनडे सीरिज आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Dec 24, 2018, 11:26 PM IST
कोहली म्हणतो माहीला टी-२० खेळायचं नाही, मग तरी धोनीचं पुनरागमन का? title=

मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धची वनडे सीरिज आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजसाठी भारताचा विकेट कीपर महेंद्रसिंग धोनीचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तर युवा विकेट कीपर ऋषभ पंतला वनडे टीममधून बाहेर काढण्यात आलं आहे. धोनीचं टी-२० मध्ये पुनरागमन झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण त्याला वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२०मध्ये वगळण्यात आलं होतं. टी-२० साठी आम्ही दुसऱ्या विकेट कीपरच्या शोधात असल्यामुळे आम्ही धोनीला संधी दिली नसल्याचं तेव्हा निवड समितीकडून सांगण्यात आलं होतं.

धोनीला आता टी-२० क्रिकेट खेळायचं नाही. तसंच आता ऋषभ पंत सारख्या युवा खेळाडूंना जास्त संधी मिळाली पाहिजे, असं धोनीनं सांगितल्याचं भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीही म्हणाला होता. २०२० साली ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये धोनी खेळणार नाही. त्यामुळे टी-२० वर्ल्ड कपसाठी आम्ही आत्तापासून तयारी करत असल्याचे संकेत निवड समितीनं नोव्हेंबर महिन्यात दिले होते. या वक्तव्यांकडे पाहिलं तर धोनीची निवड अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे.

२०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपआधी भारत फक्त ८ वनडे आणि ३ टी-२० अशा एकूण ११ मॅच खेळणार आहे. त्यामुळे धोनीला या सगळ्या मॅच खेळायला मिळाव्या आणि तो वर्ल्ड कपसाठी पूर्ण तयार व्हावा, यासाठी त्याची निवड करण्यात आल्याचं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. वर्ल्ड कपपर्यंत आता भारतीय टीममध्ये कोणतेही प्रयोग होणार नसल्याचं मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी याआधीच सांगितलं होतं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजला १२ जानेवारीपासून सिडनीतून सुरुवात होईल. यानंतर दुसरी वनडे १५ जानेवारीला ऍडलेडमध्ये आणि शेवटची आणि तिसरी वनडे १८ जानेवारीला मेलबर्नमध्ये होईल. यानंतर भारतीय टीम न्यूझीलंडविरुद्ध ५ वनडे मॅचची सीरिज खेळेल. ही सीरिज २३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत चालेल. यानंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये ६, ८ आणि १० फेब्रुवारीला ३ टी-२० मॅचची सीरिज होईल.

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद