Womens T20 World Cup 2024 : वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जात असून यात सोमवारी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना पार पडला. हा सामना केवळ याच दोन संघांसाठी नाही तर भारतासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा होता. जर पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला असता तर भारत थेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहचला असता. परंतु तसे झाले नाही आणि न्यूझीलंडने या ग्रुप स्टेज सामन्यात पाकिस्तानचा तब्बल 54 धावांनी पराभव करून सेमी फायनलमध्ये धडक दिली. त्यामुळे वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
ग्रुप ए मधून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ सेमी फायनलमध्ये पोहोचले असून ग्रुप बी मधून कोणता संघ सेमी फायनलमध्ये धडक देणार मंगळवारी ठरणार आहे. ग्रुप बी मधून सेमी फायनलच्या शर्यतीत तीन संघ असून या तीन संघाचं भवितव्य आज इंग्लंड विरुद्ध वेस्टइंडीज यांच्यात होणाऱ्या शेवटच्या ग्रुप स्टेज सामन्यात ठरणार आहे. इंग्लंडच्या संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले असून ते 6 पॉईंट्स मिळवून पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर साऊथ आफ्रिकेचा संघ 4 सामने खेळून 6 पॉईंट्स मिळवून दुसऱ्या स्थानी आहे. तर वेस्ट इंडिजच्या संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले असून ते 4 पॉईंट्स मिळवून पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तेव्हा जर आजच्या सामन्यात इंग्लंडचा संघ विजयी झाला तर इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका हे थेट सेमी फायनलमध्ये पोहोचतील आणि जर वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे दोन संघ सेमी फायनलमध्ये पोहोचतील.
ग्रुप ए मधून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघानी सेमी फायनलमध्ये स्थान मिळवल्याने भारतासह पाकिस्तान आणि श्रीलंका हे तीन संघ वर्ल्ड कप 2024 जिंकण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. तर ग्रुप बी मधून बांगलादेश आणि स्कॉटलंड या संघाचं आव्हान संपुष्टात आलंय.
हेही वाचा : हनीमूनला जाण्यासाठी भारतीय क्रिकेटरने दिला राजीनामा, 28 वर्षांनी लहान मुलीशी केला होता विवाह
मंगळवारी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 चा सेमी फायनल लाइनअप ठरेल. 17 ऑक्टोबर रोजी पहिला सेमी फायनल सामना पार पडणार असून दुसरा सामना हा 18 ऑक्टोबर रोजी होईल. तर वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 ची फायनल रविवार 20 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येईल.