World Cup 2019: वर्ल्ड कपच्या टीम निवडीला उरले काही तास, कोणाला मिळणार तिकीट?

वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमच्या घोषणेला आता अवघे काही तास उरले आहेत.

Updated: Apr 14, 2019, 06:03 PM IST
World Cup 2019: वर्ल्ड कपच्या टीम निवडीला उरले काही तास, कोणाला मिळणार तिकीट? title=

मुंबई : वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमच्या घोषणेला आता अवघे काही तास उरले आहेत. उद्या म्हणजेच १५ एप्रिलला सोमवारी मुंबईमध्ये भारतीय टीमची घोषणा होणार आहे. वर्ल्ड कपसाठीच्या बहुतेक खेळाडूंची निवड निश्चित मानली जात असली तरी दुसरा विकेट कीपर आणि चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन म्हणून कोणाचा विचार होणार, हे पाहणं औत्सुक्याचं राहील.

चौथ्या क्रमांकावर रायुडू का शंकर?

२०१५ वर्ल्ड कपनंतर भारतीय टीमने चौथ्या क्रमांकावर अनेक प्रयोग केले. पण यातला एकही प्रयोग यशस्वी झाला नाही. मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून भारताने अंबाती रायुडूला चौथ्या क्रमांकावर संधी दिली. सुरुवातीला अंबाती रायुडूने चांगली कामगिरी केली असली, तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये रायुडू अपयशी ठरला. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी पुन्हा एकदा नव्या नावाची चर्चा सुरु झाली.

रायुडूचा सध्याचा फॉर्म बघता त्याच्याऐवजी ऑल राऊंडर असलेल्या विजय शंकरला संधी मिळू शकते. विजय शंकरने गेल्या काही महिन्यांमध्ये त्याच्या बॅटिंगची चुणूक दाखवली आहे. तसंच इंग्लंडच्या वातावरणामध्ये मध्यमगती बॉलर म्हणून विजय शंकरचा बॉलिंगमध्येही फायदा होऊ शकतो. अशात निवड समिती, कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री विजय शंकरच्या नावाला पसंती देऊ शकतात.

दुसरा विकेट कीपर कोण?

वर्ल्ड कपच्या टीममध्ये दुसरा विकेट कीपर म्हणून दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. धोनी हा वर्ल्ड कपच्या टीममधला भारताचा पहिला विकेट कीपर असेल, हे निश्चित आहे.

भारताच्या टीममध्ये तिसरा ओपनर म्हणून केएल राहुल याला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर दुखापतीमुळे भारतीय टीमबाहेर असलेला हार्दिक पांड्याही टीममध्ये पुनरागमन करेल. आयपीएलमधल्या कामगिरीचा भारतीय टीम निवडताना विचार केला जाणार नाही, हे विराट कोहली आणि निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं. पण आयपीएलमध्ये खेळाडूंच्या फिटनेसकडे लक्ष दिलं जाणार होतं.

वर्ल्ड कपसाठीची भारताची संभाव्य टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर

२३ एप्रिलपर्यंत प्रत्येक टीमला त्यांच्या खेळाडूंची यादी आयसीसीला द्यावी लागणार आहे. तर या यादीमधल्या एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर बदली खेळाडूची घोषणा २३ मेपर्यंत करता येणार आहे. वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा करणारी न्यूझीलंड ही पहिली टीम आहे. तर पाकिस्तानने वर्ल्ड कपसाठीच्या २३ संभाव्य खेळाडूंची घोषणा केली आहे. यातल्या १५ जणांची वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड होणार आहे.

वर्ल्ड कपमधल्या भारताच्या मॅच

५ जून- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

१३ जून- भारत विरुद्ध न्यूझीलंड

१६ जून- भारत विरुद्ध पाकिस्तान

२२ जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान

२७ जून- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

३० जून- भारत विरुद्ध इंग्लंड

२ जुलै- भारत विरुद्ध बांगलादेश

६ जुलै- भारत विरुद्ध श्रीलंका

वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधल्या सगळ्या मॅच या भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होतील. स्टार स्पोर्ट्सकडे वर्ल्ड कप मॅचच्या प्रसारणाचे अधिकृत अधिकार आहेत. तर मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर बघता येईल.