World Cup 2019 : टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी, रेकॉर्ड किवींच्या बाजूने

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

Updated: Jun 12, 2019, 08:00 PM IST
World Cup 2019 : टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी, रेकॉर्ड किवींच्या बाजूने title=

नॉटिंगहम : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. या दोन्ही टीमनी या वर्ल्ड कपमधला अजून एकही सामना गमावला नाही. या सामन्यात पाऊस रंगाचा बेरंग करण्यासाठी अधिक सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय. पावसाच्या व्यत्ययामुळेच दोन्ही टीमना नॉटींगहॅममध्ये दाखल झाल्यावर सरावावर पाणी सोडवं लागलं.

या सामन्यापूर्वी शिखर धवनच्या रुपात भारताला मोठा धक्का बसला. धवनचा अंगठा दुखावला गेल्यानं या सामन्यात तो खेळणार नाही. यामुळे आता सलामीला आणि चौथ्या स्थानी मैदानात कोण उतरेलं याची उत्सुकता क्रिकेटचाहत्यांना लागली आहे.

धवनचा हा धक्का सोडला तर इतर संपूर्ण टीम अगदी फिट एँड फाईन आहे. रोहित, विराट, हार्दिक, धोनी कांगारुंविरुद्धच्या आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करायला आतूर असतील. बुमराह आणि भुवी आपल्या वेगवान माऱ्यानं आणि चहल-कुलदीप आपल्या फिरकीनं किवी बॅट्समनना चकवण्याचा प्रयत्न करतील. तर न्यूझीलंड पुन्हा भारताला धक्का देण्याच्या तयारीत असेल.

सराव सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत केलं होतं. मात्र वर्ल्ड कपपूर्वी भारताने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत धूळ चारली होता. दरम्यान न्यूझीलंड टीमने वर्ल्ड कपमध्ये सलग तीन विजय साकारले आहेत. श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानसारख्या टीमना किवींनी पराभूत केलं आहे. मात्र आता सामना भारतासारख्या दर्जेदार टीमशी आहे. यामुळे ते नक्कीच सावध असतील.

मार्टीन गप्टील, कॉलिन मुनरो, केन विलियमसन, रॉस टेलर असे बॅट्समन त्यांच्या ताफ्यात आहेत. तर जेम्स निशाम, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बाऊल्ट आणि ग्रँडहोम यांना भारताच्या बॅटिंगला लगाम घालण्याचं आव्हान असेल.

दोन्ही देशांमध्ये वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ७ मुकाबले झाले आहेत. यातील ३ सामने भारताने तर ४ सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. दोन्ही देशांमध्ये एकूण १०६ सामने झाले असून भारताने ५५ तर न्यूझीलंडने ४५ सामने जिंकले आहेत. १ सामना बरोबरीत राहिलाय तर ५ सामने अनिर्णित आहे.

आता धवनच्या धक्क्यातून सावरत भारत विजयी लय कायम राखण्यासाठी तर न्यूझीलंडची टीम सलग चौथ्या विजयाची नोंद करण्यासाठी प्रयत्नीशील असेल. तिकडे या दोन्ही टीमपेक्षा दमदार खेळ करण्यासाठी वरुणराजाच सज्ज झाला आहे.