'तुम्ही काय चरस फूकता का?' नेटकऱ्याने ट्रोल केलं असता हर्षा भोगले यांनी दिलं सडेतोड उत्तर, 'एक दिवस तू...'

भारताचे प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी नेदरलँडचा उल्लेख करताना चुकून स्कॉटलंड म्हटलं होतं. यानंतर सोशल मीडियावरुन काही नेटकरी टीका करु लागले होते. त्यातील एका टीकेला हर्षा भोगले यांनी उत्तर दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 19, 2023, 06:34 PM IST
'तुम्ही काय चरस फूकता का?' नेटकऱ्याने ट्रोल केलं असता हर्षा भोगले यांनी दिलं सडेतोड उत्तर, 'एक दिवस तू...' title=

एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धा सुरु असून, यानिमित्ताने सोशल मीडियावर रोज नवे रेकॉर्ड्स, फोटो, व्हिडीओ यांची चर्चा असते. यावेळी काही संघाचं, खेळाडूंचं कौतुक होतं तर काहींना मात्र टीकेची झळ सहन करावी लागते. नेदरलँडसारख्या दुबळ्या संघाने जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला तेव्हा सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा रंगली होती. पण यादरम्यान प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांना काहीजण ट्रोल करत होते. याचं कारण नेदरलँडच्या अविश्वसनीय विजयानंतर हर्षा भोगले यांनी चुकून स्कॉटलंड असा उल्लेख केला होता. काही नेटकऱ्यांनी हर्षा भोगले यांची ही चूक हेरली आणि त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

हर्षा भोगले यांनी नंतर आपली पोस्ट एडिट करत चूक सुधारली होती. पण तोपर्यंत उशीर झाला होता. पण यावेळी काही नेटकऱ्यांनी टीका करताना पातळी ओलांडली. एका नेटकऱ्याने हर्षा भोगले यांच्यावर टीका करताना एक्सवर लिहिलं की, "भोगलेसाहेब तुम्ही कोणतं चरस फूकता". नेटकऱ्याने फार गांभीर्याने ही विचारणा केली नसली तर हर्षा भोगले यांनी मात्र त्याला उत्तर दिलं. 

हर्षा भोगले यांचं उत्तर

नेटकऱ्याने प्रश्न विचारत उपहासात्मकपणे केलेल्या या टीकेली हर्षा भोगले यांनी अत्यंत संयमाने उत्तर दिलं. हर्षा भोगले यांनी आपली चूक मान्य करताना, तुमच्याकडूनही चूक होऊ शकते असं सांगितलं. "चूक झाली. कोणाबद्दल वाईट तर बोललो नाही, खिल्ली तर नाही उडवली. तुमच्याकडून एखाद्या दिवशी कदाचित चूक होऊ शकते. आशा आहे की, काहीही न फूकता होईल. शांत राहा," असं हर्षा भोगले म्हणाले. हर्षा भोगले यांनी नेहमीप्रमाणे अत्यंत शांतपणे उत्तर दिल्याने त्यांचं कौतुक होत आहे. 

डेंग्यूमुळे भारत-पाकिस्तान सामना गमावला

हर्षा भोगले यांनी डेंग्यू झाल्याने भारत-पाकिस्तान सामन्यात ते समालोचन करु शकले नाहीत. भारत-पाकिस्तान सामन्याआधीच त्यांनी आपल्याला डेंग्यू झाल्याची माहिती दिली. यामुळेच पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान संघ भिडत असताना ते समालोचन करु शकले नाहीत. सोशल मीडियावरुन त्यांनी हे जाहीर केलं होतं. हर्षा भोगले यांनी आजारपणामुळे त्यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकारल्याबद्दल सहकाऱ्यांचे आणि प्रसारण संघाचे आभार मानले. 

नेदरलँडकडून दक्षिण आफ्रिकेचा मोठा पराभव

नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला. त्याआधी 15 ऑक्टोबरला अफगानिस्तानने वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला होता. 

मंगळवारी धरमशाळाच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने 43 षटकात 8 विकेट गमावत 245 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 42.5 षटकांत सर्वबाद 207 धावांवर आटोपला. नाणेफेकीनंतर पाऊस पडल्याने 7 ओव्हर्स कमी करण्यात आल्या होत्या.