Team India भगव्या जर्सीत खेळणार पाकिस्तानविरुद्धचा सामना? BCCI म्हणली, 'भारतीय खेळाडू...'

World Cup 2023 India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना 14 तारखेला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून या सामन्याबद्दल प्रचंड उत्सुकता असतानाच आता या सामन्यातील जर्सीवरुन चर्चा सुरु झाली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 11, 2023, 12:29 PM IST
Team India भगव्या जर्सीत खेळणार पाकिस्तानविरुद्धचा सामना? BCCI म्हणली, 'भारतीय खेळाडू...' title=
हा सामना शनिवारी अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे

World Cup 2023 India vs Pakistan: भारतात सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरोधात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ मैदानात उतरणार आहे. हा सामना शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याची चर्चा मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे. या सामन्याआधी अहमदाबादमधील सर्व हॉटेल्स आणि राहण्याची सेवा पुरवणाऱ्या रुम्सची बुकिंग पूर्ण क्षमतेने झाली आहे. या सामन्याची तिकीटही विकली गेली असून त्याचा काळाबाजार सुरु असल्याचंही सांगितलं जात आहे.

भारताने परिधान केलेली विशेष जर्सी

भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या या सामन्याला केवळ 3 दिवसांचा वेळ शिल्लक असताना या सामन्यामध्ये भारतीय संघ भगव्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ भगव्या रंगाच्या जर्सीत दिसेल या चर्चेला पूर्णविराम देणारी माहिती समोर आली आहे. तशी भारताने 2019 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये इंग्लडविरुद्धच्या एकमेव सामन्यामध्ये विशेष जर्सी परिधान केली होती. या जर्सीचा रंग भगवा आणि जांभळा होता. 

या दाव्यामागील सत्य काय?

मात्र सध्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारत भगवी जर्सी घालणार असल्याची चर्चा ही केवळ अफवा आहे. बीसीसीआयने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये वेगळी विशेष जर्सी परिधान करणार आहे. याबद्दलची माहिती बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांनी दिली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ भारत वर्ल्डकपमध्ये वापरत असलेली जर्सीच परिधान करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतीय संघ सध्या सरावासाठी भगव्या रंगाची जर्सी वापरत आहेत.

आशिष शेलार काय म्हणाले?

"आम्ही प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असलेली ही चर्चा पुर्णपणे फेटाळत आहोत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ दुसऱ्या प्रकारचं कीट (कपडे) वापरणार नाही. यासंदर्भात दिल्या जाणाऱ्या बातम्या बिनबुडाच्या असून कोणाच्या तरी कल्पनेतून त्या तयार करण्यात आल्या आहेत. भारतीय खेळाडू भारताच्या संघासाठी निश्चित केलेल्या रंगांच्या जर्सीमध्येच मैदानात उतरतील. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 चा भारतीय संघाचा रंग निळात असणार आहे," असं शेलार यांनी 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना सांगितलं.

भारत-पाकिस्तान सामन्याचा रेकॉर्ड कसा?

आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ 7 वेळा आमने-सामने आले आहेत. हे 7 ही एकदिवसीय सामने भारतानेच जिंकले आहेत. त्यामुळेच अहमदाबादमध्ये होणाऱ्या या सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ प्रचंड प्रेशरमध्ये असणार आहे. दुसरीकडे भारत आपला 7-0 चा रेकॉर्ड 8-0 असा अधिक भक्कम करण्याच्या इराद्यानेच मैदानावर उतरेल यात शंका नाही.