World Cup 2023 Virat Kohli Form: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान रविवारी झालेल्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पाचव्या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला. भारताने हा सामना 6 विकेट्स आणि 52 बॉल राखून जिंकला. भारताच्या या विजयामध्ये विराट कोहली आणि के. एल. राहुल यांनी केलेल्या संयमी खेळीचा मोलाचा वाटा होता. भारताचे पहिली तिन्ही फलंदाज भोपळाही न फोडता तंबूत परतले तेव्हा भारताचा स्कोअर 2 धावांवर 3 गडी बाद असा होता. असा परिस्थितीमधून कोहली आणि के. एल. राहुलने 165 धावांची पार्टनरशीप करत 200 धावांचं लक्ष्य सहज गाठण्यात मोलाची भूमिका बजावली. या सामन्यातील सामनावीर पुरस्कार के. एल. राहुलला प्रदान करण्यात आला. तर विराटचं शतक अवघ्या 15 धावांनी हुकलं. विराटने या सामन्यामध्ये उत्तम खेळी केली असली तरी विराटला भारताने वर्ल्डकप स्पर्धेच्या सुरुवातीच्या सरसकट सर्वच सामन्यांमध्ये खेळवू नये असं मत एका माजी क्रिकेटपटूने मांडलं आहे.
रविवारी झालेल्या वर्ल्डकपमधील भारताच्या पहिल्याच सामन्यात 200 धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने 2 धावांवर 3 बादवरुन सामना जिंकवून देण्यासाठी 85 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने केवळ 6 चौकार लगावे. म्हणजेच तब्बल 61 धावा त्याने पळून काढल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर खेळपट्टीवर टिकून राहण्यासाठी आपली आक्रमक शैली बाजूला ठेवत विराटने झुंजार खेळी करत के. एल. राहुलच्या मदतीने भारताला विजय मिळवून दिला. विराटचं शतक मात्र हुकलं. त्यानंतर सामना जिंकून देणाऱ्या के. एल. राहुलचं शतकही हुकलं. तो 97 धावांवर नाबाद राहिला. मात्र दोघांनी संघाला विजय मिळून दिल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विराट कोहलीने दणक्यात वर्ल्डकपला सुरुवात केल्याची चर्चा असतानाच इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉण्टी पानेसरने एक महत्त्वाचं विधान केलं आहे. पानेसरने विराट कोहलीची कामगिरी भारताला वर्ल्डकप जिंकवून देण्यासाठी निर्णायक ठरेल असं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी त्याने विराटला स्पर्धेच्या सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या संख्येनं सामने खेळायला लावणंही चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. टी-20 वर्ल्डकपमध्येही विराटने पाकिस्तानविरुद्ध 82 धावांची ऐतिहासिक खेळी केली. मात्र उपांत्यफेरीमध्ये भारतीय संघ इंग्लंविरुद्धच्या सामन्यात 10 विकेट्सने पराभूत झाला. हा मुद्दा संदर्भाला घेत पानेसरने विराट सर्वोत्तम कामगिरीबद्दल विधान केलं आहे. विराट त्याची सर्वोत्त कामगिरी कधी करत असेल याचा वेळही महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. विराट टी-20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये सुरुवातीच्या सामन्यांमध्ये फार उत्तम खेळला असं पानेसर म्हणाला.
"विराट कोहली सर्वोत्तम कामगिरी करत असतो तेव्हा त्याला पाहताना समाधान वाटतं. मागील वर्षी टी-20 वर्ल्डकपमध्ये तो सुरुवातीलाच फार उत्तम कामगिरी करत होता. त्याने साखळी फेरीमध्ये फार लवकर सर्वोत्तम कामगिरी करण्यास सुरुवात केली. मला वाटतं की त्याने यावेळेस अंतिम सामन्यासाठी किंवा उपांत्य सामन्यांसाठी आपली खास खेळी राखीव ठेवावी," असं पानेसर म्हणाला आहे. म्हणजेच विराट कोहलीने स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांपासून आक्रमक खेळ करण्याऐवजी लिंबू-टिंबू संघांविरुद्ध आराम करण्याचाही विचार करावा असं पानेसरला सूचित करायचं आहे. यामुळे मुख्य सामन्यांसाठी किंवा करो या मरो प्रकारच्या सामन्यांसाठी त्याने अधिक सक्षमपणे तयार व्हावं असं या इंग्लडच्या माजी खेळाडूला म्हणायचं आहे.
भारताने 2011 मध्ये विश्वचषक स्पर्धा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. वानखेडेच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अंतीम सामन्यात भारताने विजय मिळवून 1983 नंतर दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला होता.