'जर तुझ्या पुतण्याला कोहलीचं टी-शर्ट हवं असेल...', वसीम अक्रम बाबर आझमवर संतापला, 'हेच करायचं असेल तर...'

भारताने एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा 7 गडी राखून मोठा पराभव केला. सामन्यानंतर विराट कोहली आणि बाबर आझम मैदानात आले होते. यावेळी विराटने बाबरला आपली स्वाक्षरी असणारा टी-शर्ट दिला. यावरुन पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू वसीम अक्रम संतापला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 15, 2023, 10:47 AM IST
'जर तुझ्या पुतण्याला कोहलीचं टी-शर्ट हवं असेल...', वसीम अक्रम बाबर आझमवर संतापला, 'हेच करायचं असेल तर...' title=

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये शनिवारी पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघ आपापसात भिडले. यावेळी भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. भारताने तब्बल 7  गडी राखत पाकिस्तानला धूळ चारत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. तसंच वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला पराभूत करण्याचा आपला रेकॉर्ड कायम ठेवला. आतापर्यंत 8 वेळा दोन्ही संघ वर्ल्डकपमध्ये आमने-सामने आले असून सर्व सामने भारताने जिंकले आहेत. सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू आपापसात चर्चा करताना दिसले. यादरम्यान भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला आपली स्वाक्षऱी असणारं टी-शर्ट भेट म्हणून दिलं. यानंतर एकीकडे कौतुक होत असताना, पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू वसीम अक्रम यांना मात्र हे पटलेलं नाही. वसीम अक्रम यांनी बाबर आझमवर जाहीर टीका केली आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात भारताने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान प्रथम फलंदाजी करताना पूर्ण 50 ओव्हरही खेळू शकला नाही. 191 धावांवर संपूर्ण संघ गारद झाला. भारताने अत्यंत सहजपणे या लक्ष्याचा पाठलाग केला. कर्णधार रोहित शर्माने 86 धावांची जबरदस्त खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रोवला. 

पाकिस्तान संघाकडून बाबर आझमने सर्वाधिक 50 धावा केल्या. तिसऱ्या विकेटसाठी त्याने मोहम्मद रिझवानसह 82 धावांची भागीदारी केली. मात्र नंतर 36 धावात 8 विकेट गमावत आपल्या पराभवावर शिक्कामोर्तब केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

सामन्यानंतर विराट कोहलीने मैदानात जाऊन बाबर आझमला आपली स्वाक्षरी असणारं टी-शर्ट भेट म्हणून दिलं. यानंतर विराट कोहलीचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. दोन्ही खेळाडू याआधीही अनेकदा अशाप्रकारे गप्पा मारताना दिसले आहेत. पण वसीम अक्रमला बाबर आझमने टी-शर्ट स्विकारणं आवडलेलं नाही. 

सामना संपल्यानंतर चर्चेदरम्यान एका चाहत्याने केलेली कमेंट वाचण्यात आली. यामध्ये त्या चाहत्याने इतक्या मोठ्या पराभवानंतर बाबर आझमने विराट कोहलीकडून टी-शर्ट स्विकारणं दुखावणारं असल्याचं लिहिलं होतं. "बाबर आझमने विराट कोहलीकडून दोन टी-शर्ट घेतल्याचं दिसत आहे. प्रत्येकजण ही क्लिप वारंवार दाखवत आहे. पण इतक्या वाईट खेळीनंतर तुमचे चाहते दुखावलेले असताना हे खासगीत करायला हवं होतं. मैदानात हा प्रकार व्हायला नको होता," असं चाहत्याने म्हटलं होतं.

वसीम अक्रमने यावर सहमती दर्शवताना हे करण्यासाठी आजचा दिवस योग्य नव्हता, तुम्ही ड्रेसिंग रुममध्येही करु शकला असता असं म्हटलं. "फोटो पाहिल्यानंतर मीदेखील नेमकं हेच म्हणत आहे. आजच दिवस यासाठी अजिबात योग्य नव्हता. जर तुला करायचा असेलं, तुझ्या काकाच्या मुलाने कोहलीचं टी-शर्ट मागितलं असेल तर मग सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये करा," अशा शब्दातं वसीम अक्रमने आपला संताप व्यक्त केला.