World Cup 2023 Points Table Pakistan Afghanistan Chances To Be In Top 4: वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमधील 41 व्या सामन्यामध्ये न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धचा सामना 5 विकेट्स अन् 26.4 ओव्हर राखून सहज जिंकला. या मोठ्या विजयामुळे न्यूझीलंडचं सेमीफायनलमधील स्थान जवळपास निश्चित झालं आहे. न्यूझीलंडच्या या दमदार विजयाचा फटका पाकिस्तानला बसला असून पाकिस्तान वर्ल्ड कपच्या शर्यतीमधून बाहेर पडल्यात जमा आहे. असं असलं तरी शनिवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये अगदी चमत्कारच पाकिस्तानला वाचवू शकतो आणि पुन्हा अव्वल 4 मध्ये येण्याची संधी मिळू शकते. असाच काहीसा प्रकार अफगाणिस्तानबद्दल म्हणता येईल. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली तर किती अंतराने त्यांना सामना जिंकावा लागेल आणि त्यांनी आधी गोलंदाजी केली तर किती ओव्हरमध्ये लक्ष्य गाठावं लागेल हे पाहूयात...
भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे तिन्ही संघ अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असून सेमीफायलनसाठी ते पात्र ठरले आहेत. चौथ्या स्थानावर सध्या न्यूझीलंडचा संघ असून त्यांचं स्थान अबाधित राहिल असं दिसत आहे. मात्र पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अविश्वसनिय कामगिरी केली तर ते चौथ्या स्थानावर झेप घेऊ शकतात. सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये चुरस असली तरी तांत्रिक दृष्ट्या अफगाणिस्तानही अजूनही सेमीफायनलच्या शर्यतीमधून बाहेर पडलेला नाही.
न्यूझीलंडने साखळीफेरीतील शेवटचा सामना जिंकून चौथं स्थान कायम राखलं आहे. न्यूझीलंडने 9 पैकी 5 सामने जिंकले असून 10 पॉइण्ट्सहीत ते +0.743 नेट रन रेटसहीत चौथ्या स्थानी आहेत. 10 पॉइण्ट्सपर्यंत मजल मारण्याची संधी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानलाही आहे. मात्र त्यांना नेट रन रेटमध्ये न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी भीमपराक्रमच करावा लागणार आहे. पाकिस्तानचा नेट रन रेट +0.036 असून अफगाणिस्तानचा नेट रन रेट -0.338 इतकं आहे.
पाकिस्तानला आता केवळ शेवटचा सामना जिंकून चालणार नाही. त्यांना आपला +0.036 हा नेट रन रेट न्यूझीलंडच्या नेट रन रेटपेक्षा म्हणजेच +0.743 हून अधिक सरस करण्यासाठी पहिल्यांदा फलंदाजी केल्यास 287 धावांच्या फरकाने इंग्लंडला पराभूत करावं लागेल. धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला 284 चेंडू बाकी ठेऊन सामना जिंकावा लागेल. म्हणजेच त्यांना 2.4 ओव्हरमध्ये इंग्लंडने दिलेलं टार्गेट पूर्ण करावं लागेल. या दोन्ही गोष्टी सध्या तरी इंग्लंड आणि पाकिस्तानी संघाची कामगिरी पाहिल्यास अशक्य वाटत आहे.
Pakistan now has to beat England at the Eden Gardens on Saturday by an #unattainable margin
by around 287 runs while batting 1st
or
by about 284 balls to spare while chasing!#NZvsSL #NZvsSL #SLvNZ #SLvsNZ#CWC #CWC2023 #CWC23 #PakvsEng #PakvEng #EngvsPak— Mohandas Menon (@mohanstatsman) November 9, 2023
अफगाणिस्तानला नेट रन रेटमध्ये न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी नेमकं काय करावं लागेल याबद्दल बोलायचं झाल्यास, अफगाणिस्तानला सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आज दक्षिण आफ्रिकेला तब्बल 400 हून अधिक धावांनी पराभूत करावं लागले. मात्र सध्याची दक्षिण आफ्रिकेची कामगिरी पाहता अफगाणिस्तानला हा सामना एवढ्या फरकाने जिंकणे केवळ अशक्य आहे.